शिक्षक बँकेच्या चार वर्षांच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी
Sangli News : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराबाबत गंभीर आक्षेप नोंदवत जागा खरेदी, इमारत बांधकाम, भरती, व्याजदर, लाभांश तसेच विविध खर्चाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी सेवा मंडळाने पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणी सहकार आयुक्त, पुणे यांच्यामार्फतही दाद मागणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बँकेच्या विद्यमान कारभारामुळे ६००हून अधिक सभासदांनी बँकेकडे पाठ फिरवली असून, कात्रणातील आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत ६४६ सभासदांची घट झाली आहे, असा दावा मंडळाने केला. सभासदांना आकर्षित करण्यासाठी व्याजदर कमी आणि लाभांश अधिक असणे आवश्यक आहे. मात्र, त्याउलट सभासदांवर विविध कपातींचा भार टाकण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पुरोगामी सेवा मंडळाने मांडलेल्या माहितीनुसार, बँकेच्या जागा खरेदीसाठी सुमारे २ कोटी ४२ लाख ६३ हजार रुपये, इमारत बांधकामासाठी ६ कोटी ४ लाख २१ हजार रुपये, इलेक्ट्रिकल फिटिंगसाठी ५७ लाख २८ हजार रुपये, फर्निचर व फिटिंगसाठी १ कोटी २२ लाख २३ हजार रुपये आणि लिफ्टसाठी १६ लाख २० हजार रुपये, असा एकूण सुमारे १० कोटी ३९ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला.
सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर
या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून खर्चाचे स्वरूप, निविदा प्रक्रिया आणि निर्णयप्रक्रिया स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.
सन २०२२-२३ मध्ये सभासदांना केवळ दीड टक्का लाभांश देण्यात आला; मात्र त्याच काळात जागा व इमारतीवर मोठा खर्च करण्यात आल्याचा आरोप मंडळाने केला. मुख्यालयात ९५ टक्के सभासद नियमित येत नसताना त्या इमारतीवर एवढा मोठा खर्च करण्याची गरज काय?, असा सवालही करण्यात आला.
मंडळाच्या म्हणण्यानुसार, खर्चात सुमारे ३ कोटी ४३ लाख रुपयांची बचत केली असती तर सभासदांना ७ ते ८ टक्क्यांपर्यंत लाभांश देता आला असता.
सदाशिव पाटील म्हणाले, “आमच्या काळात साडेतेरा टक्के असलेला व्याजदर आम्ही टप्प्याटप्प्याने कमी करून ९ टक्क्यांवर आणला. मात्र विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ९ टक्के व्याजदर केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत तो पुन्हा ९.७५ टक्के केला. चार वर्षांत केवळ ०.१५ टक्के व्याजदर कमी करण्यात आला आहे.”
“चार वर्षांत नवीन इमारत, प्रमोशन आणि भरती यापलीकडे काही केलेले नाही. हे सभासदांचे विश्वस्त आहेत, मालक नाहीत. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत,” अशी टीकाही त्यांनी केली.
‘स्पेशल पे’ वर्गणीमध्ये सुमारे ३६ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा करत, “या रकमेचे नेमके स्वरूप काय? हा शब्द बदलून बोनस दिला आहे का?” असा सवाल पुरोगामी सेवा मंडळाने उपस्थित केला. संचालकांवरील सुमारे १२ लाख रुपयांच्या खर्चाचे कारण व तपशीलही जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. छपाई व स्टेशनरीवर झालेल्या खर्चावरही मंडळाने आक्षेप घेतला.
सयाजीराव पाटील म्हणाले, “विद्यमान सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यात दिलेला एकही शब्द पूर्ण केलेला नाही. चार वर्षांत व्याजदरात केवळ ०.१५ टक्के घट झाली. आम्ही १३ टक्क्यांवरून व्याजदर ९ टक्क्यांपर्यंत आणला होता. दोन शाखांच्या नूतनीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा कारभार बँकेच्या हिताचा आहे का, याचे स्पष्टीकरण द्यावे.”
बँकेची जुनी इमारत ही बँकेची अस्मिता असून ती विकण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला. “ही इमारत विकू देणार नाही,” असा इशारा मंडळाने दिला. तसेच भरतीमध्ये पूर्वी १५०चा आकृतीबंध ओलांडला नव्हता; विद्यमान व्यवस्थापनाने मात्र त्याबाबतच्या भूमिकेत बदल केल्याचा आरोप करण्यात आला.
नोकरभरतीविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांनीच पुढे नोकरभरती केल्याचा आरोप करत, संबंधितांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी शशिकांत बाजबळे, सयाजीराव पाटील, सदाशिव पाटील, राजाराम शिंदे, प्रदीप मोकाशी, अरुण पाटील, माणिकराव पाटील, रमेश पाटील, अरविंद गावडे आदी उपस्थित होते.
साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी






