राजापूर / प्रतिनिधी : सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३० वाजता ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने मोठा अपघात टळला. त्यांच्या खबरदारीमुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती.
श्री. कुर्णे हे आपल्या ताब्यातील बस क्र. एम. एच. १४, बी. टी. २९७५ ही बस राजापूर सांगली बस घेवून सांगली येथुन सकाळी ६.३० वाजता रवाना झाले होते. ही बस सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान अणस्कुरा घाट उतरत असताना अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले. चालक श्री. कुर्णे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी अत्यंत सावधगिरीने बस डोंगराच्या दिशेने वळवत थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला.
या बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. हे सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. दरम्यान या गाडीने राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व पाचल तलाठी सतीश शिंदे हे देखील प्रवास करीत होते. त्यांनीही मोठया अपघातातून वाचल्याची प्रतिक्रिया दिली. चालक कुर्णे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.राज्यात अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे, त्यामुळे महामार्गावरील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे शासनाच्या दुर्लक्ष होत असल्याची खंत रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. कोकणाात जाणारे आणि इतरही राज्य महामार्गावर रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे अपघाताचं सत्र वाढत आहे. याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर देखील सततचं अपघाताचं सत्र सुरुच आहे.
परशुराम घाटात सर्वाधिक अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गेल्य़ा काही महिन्यांपासून या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चौपदीकरण होऊन बराच अवधी लोटला मात्र परशुराम घाट परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा वेग अद्यापही मंदावलेला आहे. महामार्गाच्या दुरावस्थेवर प्रवाशांनी कायमच नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर कायमच ताशेरे ओढले आहेत. परशुराम घाट आणि आजूबाजूचा परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहिजे तसं बांधकाम झालेलं नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक आणि प्रवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातील वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. त्यामुळे याठिकाणच्या भौगोलिक रचनेची पाहणी आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शनिवारी घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंताच्या खालील भागात कातळाच्या तपासणीला सुरूवात करण्यात आलेली आहे.