Sanjay Raut News: अयोध्येचा अंडरवर्ल्ड चालवणारा 'दाऊद' कोण...? संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut News: देशाला कलंकित करणाऱ्या घटना अयोध्येत घडत आहेत. प्रभू श्रीरामाच्या नावाने देशाची अस्मिता उंचावली गेली, पण आज अयोध्येत अंडरवर्ल्डसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने अयोध्येत गुंड आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं आहे. राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं असून त्यामध्ये भाजपशी संबंधित लोकांची नावं आहेत.” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, “लोकांच्या मनात चीड आणि अस्वस्थता आहे, पण दहशतीमुळे कोणी बोलत नाही. बृजभूषण शरण सिंह आणि बागेश्वर बाबा यांनीही बोललो तर जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. अयोध्येचा अंडरवर्ल्ड चालवणारा ‘दाऊद’ कोण आहे, हे मी अयोध्येत जाऊन सांगायला तयार आहे.”
‘एक जण झाड पडून मेला तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला’ असं म्हणत ते दात काढून हसत आहेत. अशा शब्दांत मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी सामान्य नागिकांची थट्टा केली. ही किती क्रूरता आणि विकृती आहे. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष आहे हे त्यांच्या मुंबई अध्यक्षांनी दाखवून दिलं.” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडी जरी संवेदना शिल्लक असेल, तर त्यांनी अशा व्यक्तीला तात्काळ पदावरून हटवावं.” असे आव्हानही त्यांनी केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, ” नालेसफाई झाली नाही, धोकादायक झाडांबाबतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे त्या ११ वर्षांच्या मुलाचा जीव गेला. त्याच्या आई-वडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही हसत आहात. ही लाजिरवाणी बाब आहे. तुम्ही १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करता. पण प्रत्यक्षात मुंबई तुंबली आहे. माणसं आणि गाड्या पाण्यात वाहून जात आहेत. शंभर टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे उरलेले चार टक्के कोणाचे कमिशन आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या लोकांनी मुंबई महानगरपालिका तर लुटलीच, पण तिकडे राम मंदिर लुटायलाही मागे-पुढे पाहिलं नाही, अशी सणसणीत टिकाही त्यांनी केली.
“११ वर्षांचा निष्पाप विहान श्रीवास्तव मृत्यूमुखी पडला. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी त्याचा क्रिकेटचा चेंडू त्याच्यासोबत ठेवण्यात आला. हे अत्यंत वेदनादायी चित्र आहे. हे अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं आणि भ्रष्टाचाराचं फलित आहे. लोकांचा मृत्यू होत असताना हसणं म्हणजे मृतांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे. गेली सहा-सात महिने तुमच्याकडे सत्ता आहे. त्याआधी साडेतीन वर्षे प्रशासनही तुमच्याच नियंत्रणाखाली होतं. मग प्रत्येक गोष्टीला शिवसेनेला जबाबदार कसं धरता? जर प्रत्येक वेळी २५ वर्षांपूर्वीचा इतिहास काढावा लागत असेल, तर तुम्ही मुंबई महापालिका चालवण्यास अयोग्य आहात. गिरीश महाजन नियंत्रण कक्षात बसून तमाशा करत होते. महाराष्ट्रात राम मंदिरापासून मुंबईपर्यंत लुटालूट सुरू आहे.” अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्याबद्दल तडीपार करण्याची कारवाई होत असेल, तर या देशात लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही. फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना तडीपार करायचं, हेच सुरू आहे. आमचे आंबेगाव-जुन्नरचे संपर्कप्रमुख तथा जिल्हाप्रमुख धीरज भोर यांनी मला एक विषय सांगितला. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं होतं. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा, लहान मुलांचाही मृत्यू होत आहे. त्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होते. मात्र गुन्हे फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या २०० कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले. हा किती मोठा पक्षपात आहे. हे गुन्हे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दबावातून दाखल करण्यात आले. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही आंदोलनात होते. हा सामाजिक आणि जनसुरक्षेचा विषय होता. भाजप आणि महायुतीतील कार्यकर्तेही आंदोलनात होते, पण कारवाई फक्त शिवसैनिकांवर झाली.” असा आरोपही संजय राऊत यांनी केला.






