: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर
या निष्काळजीपणाविरोधात आता सातारा–लोणंद मार्गावरील सर्व गावांतील ग्रामस्थ एकवटले आहेत. “जर प्रशासनाला व NHAI ला सामान्य नागरिकांच्या, प्रवाशांच्या आणि लहान मुलांच्या प्राणाची पर्वा नसेल, तर सर्व गावांना सोबत घेऊन NHAI चे चालू असलेले काम बंद पाडू आणि संपूर्ण महामार्ग रोखून धरू,” असा महा-इशारा भाजप युवा मोर्चाचे सामाजिक कार्यकर्ते मदन भीमाजी साबळे यांनी दिला आहे.
सातारा-लोणंद रस्त्यावरील जुने पूल कधीही कोसळतील अशी भीती निर्माण झाली आहे. संभाव्य दुर्घटनेत नागरिकांचे बळी जाऊ नयेत, यासाठी मदन साबळे आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय पातळीवर लढा देऊन या मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश मिळवले.
“आम्ही भांडून, पाठपुरावा करून बंदीचे आदेश आणले. कारण आम्हाला जनतेच्या जिवाची काळजी आहे! मग आता प्रत्यक्ष रस्त्यावर त्याची अंमलबजावणी का होत नाही? केवळ आदेशाचे कागद नाचवून जिल्हा प्रशासन आणि NHAI स्वतःचे अंग का झटकत आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे—तुम्हा अधिकाऱ्यांना जनतेच्या जिवाशी काहीही देणंघेणं उरलेले नाही!” असा जळजळीत सवाल मदन साबळे यांनी उपस्थित केला आहे.
या मार्गावरील पुलांच्या सुरक्षेकडे व कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) प्रशासनालाही थेट लक्ष्य करण्यात आले आहे.
“जिल्हा प्रशासनाने बंदीचे आदेश देऊनही NHAI चे अधिकारी डोळे झाकून बसले आहेत. जर NHAI ला नागरिकांच्या सुरक्षेचे काहीच सोयरसुतक नसेल, तर या प्रकल्पाचे काम पुढे चालू देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आधी पुलांची सुरक्षा निश्चित करा आणि अवजड वाहने रोखा, मगच रस्त्याचे काम करा,” असा इशारा देण्यात आला आहे.
सगळी गावे उतरणार रस्त्यावर: प्रशासनाने २४ तासांत कारवाई न केल्यास सातारा–लोणंद मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिक, शेतकरी व तरुण महामार्गावर उतरून तीव्र ‘महा-रस्ता रोको’ आंदोलन करतील.
अंग झटकणे थांबवून कडक गस्त ठेवा: जिल्हा प्रशासन, आरटीओ (RTO), पोलीस आणि NHAI ने तात्काळ २४ तास संयुक्त पथके रस्त्यावर उतरवून प्रत्यक्ष वाहने रोखावीत.
कायदेशीर गुन्हे व वाहने जप्त करा: बंदी आदेश मोडून येणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनावर तात्काळ गुन्हे दाखल करून वाहने जप्त करावीत आणि दंड आकारावा.






