माऊलींच्या पालखी स्वागतासाठी सातारा पोलीस सज्ज; २ जुलै रोजी महत्त्वाच्या ठिकाणांचा घेतला आढावा
Ashadhi Wari 2026: आषाढी वारी निमित्ताने प्रस्थान झालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर, लाखो भाविक आणि वारकऱ्यांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि सोहळा शिस्तीत पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) यांनी आज, दिनांक २ जुलै २०२६ रोजी पालखी मार्गावरील प्रमुख ठिकाणांचा प्रत्यक्ष दौरा करून पाहणी केली व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सोबत फलटण डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे, विशाल कृष्णा खांबे (DYSP), स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक व्ही. बी. घोडके, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजबळ, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बल्लाळ, लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे, वाठार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले, जिल्हा विशेष शाखा सातारा येथील एपीआय सुवर्णा काटकर आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणंद शहर पालखी तळ: लोणंद येथील मुख्य पालखी तळाची पाहणी करून भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेडिंग, आपत्कालीन मार्ग आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष ‘दामिनी पथक’ तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नीरा पाडेगाव दत्त घाट (पालखी स्नान): नीरा नदीच्या पात्रात होणाऱ्या पवित्र पालखी स्नान सोहळ्याच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी दत्त घाटावर जीवरक्षक, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि नदीपात्रात बोट तैनात ठेवण्याचे आदेश दिले. घाटावरील गर्दी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जाईल.
फलटण रोड – चांदोबाचा लिंब (उभे रिंगण): वारकऱ्यांसह देश-विदेशातील भाविकांचे आकर्षण असलेल्या ‘चांदोबाचा लिंब’ येथील पहिल्या उभ्या रिंगण सोहळ्याच्या जागेची पोलीस प्रमुखांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली. रिंगण परिसरात चेंगराचेंगरी टाळण्यासाठी मजबूत बॅरिकेडिंग आणि कडक व्ही.आय.पी व सर्वसामान्य भाविकांसाठी स्वतंत्र रांगांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
नवीन बायपास पालखी महामार्ग वाहतूक नियोजन: पालखी सोहळ्यामुळे मुख्य शहरातील रस्त्यांवर प्रचंड गर्दी होणार असल्याने, नवीन बायपास पालखी महामार्गावरून सर्व प्रकारच्या जड व व्यावसायिक वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. या बायपास मार्गावर ठिकठिकाणी पोलीस जवानांची नेमणूक करण्यात आली असून, मुख्य शहरात प्रवेश न करता बाहेरील वाहने सुरक्षितपणे पुढे मार्गस्थ केली जातील.
वाहतूक वळवली: पालखी सोहळ्यादरम्यान लोणंद-फलटण मुख्य मार्गावरील सर्वसामान्य व अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून ती नवीन बायपास आणि इतर पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे. वाहनचालकांच्या मार्गदर्शनासाठी ठळक दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे पाळत: पालखी तळ, दत्त घाट, नवीन बायपास जंक्शन आणि रिंगण सोहळा परिसरात गर्दीवर आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिसरा डोळा म्हणजेच ड्रोन कॅमेरे आणि तात्पुरत्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
साध्या वेशातील पोलीस आणि हेल्प डेस्क: चोरी, पाकीटमारी रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पथके तैनात असतील. तसेच हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि भाविकांना मदत करण्यासाठी प्रमुख ठिकाणी ‘पोलीस मदत केंद्र’ उभारले जाणार आहेत.
“माऊलींचा हा पालखी सोहळा अत्यंत उत्साहात, सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी सातारा पोलीस कटिबद्ध आहेत. मुख्य शहरातील गर्दी आणि कोंडी टाळण्यासाठी आम्ही नवीन बायपास महामार्गाचे चोख वाहतूक नियोजन केले आहे. वाहनचालकांनी आणि नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.”






