File Photo : Accident
मंगळवेढा : लातूरहून कोल्हापूरकडे निघालेल्या बसचा मंगळवेढ्याजवळ अपघात झाला. ही बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी जात होती. तेव्हा ही दुर्घटना घडली. खाजगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सांगोला मार्गावरील काळ्या खडकाजवळ रस्त्याच्या बाजूला बस पलटी झाली. यामध्ये 39 विद्यार्थ्यांसह शिक्षक, चालक जखमी झाले.
श्री गणेश विद्यालय शिवणखेड बु.ता.चाकूर (जि.लातूर) या प्रशालेची सहल खाजगी बस (क्र. एम एच 24,ए.बी.7281) ही कोल्हापूरकडे जात असताना मंगळवेढ्याच्या पुढे 3 कि.मी. अंतरावरील काळ्या खडकाजवळ आली. त्यानंतर चालक गोविंद मोरे याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत बस वेगात नेली. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. त्यामुळे बसमधील विद्यार्थी व शिक्षक यांना इजा होऊन ते जखमी झाले. या अपघातानंतर चालकाने याची माहिती कोणालाही दिली नाही. उलट घटनास्थळावरून तो पसार झाला.
याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. हा अपघात गुरुवारी (दि.26) पहाटे सव्वा चारच्या सुमारास झाला. दरम्यान,अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना 108 क्रमांकावर कॉल करून शासकिय अॅब्युलन्स बोलावून तात्काळ मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना जानकर, डॉ.प्रविण माने, डॉ.निखील जोशी, डॉ.शिरीष कुलकर्णी यांच्यासह रुग्णालयातील कर्मचार्यांनी तातडीचे प्रयत्न करत सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार केले.
काही विद्यार्थ्यांना गंभीर इजा
या अपघातात काहींना गंभीर इजा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हाड फ्रॅक्चर झाल्याचेही सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी आठ वाजता प्राथमिक उपचार केल्यानंतर मंगळवेढ्यातील एका खाजगी बसने त्यांना लातूरकडे पाठविण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच मंगळवेढा पोलिस शासकिय वाहनाने घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.
चालकाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, चालकाने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना जखमी करून अपघाताची माहिती पोलिसांत न देताच पळून गेला. त्यामुळे याप्रकरणी चालक गोविंद ज्ञानदेव मोरे (रा.चालबर्गा ता.औसा) याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.