ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे निधन (फोटो- सोशल मीडिया)
Maruti Chitampalli Passed Away: ज्येष्ठ लेखक, पक्षी अभ्यासक, वन्यप्राणी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचे दुःखद निधन झाले आहे. मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना अरण्यऋषी या नावाने देखील ओळखले जायचे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ३० एप्रिल २०२५ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या सोहळ्यातून घरी परतल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती,असे समजते आहे. सोलापूरमधील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे.
मारुती चितमपल्ली यांनी ३६ वर्षे वनविभागात नोकरी केली. त्यांना पर्यावरणाशी संबंधित मोठ्या प्रमाणात माहिती होती. अरण्यवाचन, पक्षी आणि वनस्पती यांचे वैशिट्ये सांगणारी जवळपास २५ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मारुती चितमपल्ली यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक होते. त्यांनी या विषयावर मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.