शनिशिंगणापुरात शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक होणार, देवस्थानचा निर्णय
Shani Shingnapur News Marathi: अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरच्या देवस्थानसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. शनिशिंगणापूरच्या शनि देवाला आता फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्यात येणार आहे. शनिदेवाला येथील शनि देवाला यापुढे शुद्ध तेलाचा तेलाभिषेक करण्याचा निर्णय शनि शिंगणापूरच्या देवस्थानाकडून घेण्यात आला आहे.
शनि शिंगणापूरच्या शनिदेवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते. दरम्यान शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनी देवाला वाहण्याचा विश्वस्त मंडळाकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर (शनी चौथऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे) परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात.
यामध्ये अन्न आणि भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्याने शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची झीज होते आहे. याचपार्श्वभूमीवर शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शनि शिंगणापूर देवस्थानच्या नवीन नियमांनुसार १ मार्चपासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच शनिदेवावर अभिषेक करावा लागणार आहे. शनि शिंगणापूर हे भक्तीचे केंद्र मानले जाते. भगवान शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे हजारो भाविक तेल अभिषेक करतात. मात्र, शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.