सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. निधी पाहिजे, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा दम मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. नितेश राणे यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. राणेंच्या विधानावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातील नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाने बॅनरबाजी केली आहे. कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे.
गिरीश गुरनानी म्हणाले, सत्ता येते जाते पण सत्तेचा वढा माज कधी कोणी केला नाही. एखादा विरोधी पक्षाचा आमदार किंवा सरपंच स्वतःच्या वयक्तिक कामासाठी मंत्र्यांना निधी मागत नाही. तो आपल्या गावाच्या किंवा विभागाच्या लोकांच्या विकासासाठी निधी मागत असतो. असले गलिच्छ राजकारण कधीही महाराष्ट्रात झाला नाही पण आज एक मंत्री भर सभेत असे वक्तव्य करतो हे नींदनीय आहे.
बॅनरवरती नेमकं काय लिहलंय?
“सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब” असं लिहून निधी वाटपावरून राणे यांच्या विधानावरून टीका करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा?” असा सवाल देखील बॅनर मधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आला आहे. राणेंच्या विरोधात पुण्यातील कोथरूड परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते ?
ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे किंवा ज्याठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही, निधी हवा असेल तर आमच्याकडे या आणि प्रवेश करा, असंही राणे यांनी म्हटलं होतं. तर पुढील वर्षी महायुतीच्या उमेदवारालाच निधी मिळणार आहे. येणाऱ्या निवडणुका शतप्रतिशत भाजप म्हणून लढविणार आहोत. 10 वर्षात विरोधात असताना खूप मला त्रास झाला आता मी सत्तेत आहे. आपल्या भाजपची ताकद वाढायला हवी. मुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद वाढवा, त्यांचे हात बळकट करा, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय. कोणीही चुकून विरोधकांना मदत करू नका. या जिल्ह्यात महायुतीच्या नेतृत्वाखाली काम करू, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.