सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरात झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा ‘महावितरण’च्या वीज यंत्रणेला बसल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी झाडे पडल्याने आणि काही ठिकाणी पाण्याच्या लोंढ्यांमुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. पुण्यातील कोथरुडमध्येही वीजपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यावरुन आता शरद पवारांच्या राषट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
पुण्यातील कोथरूड महावितरणचे अभियंता राजेश काळे यांची गुरनानी यांनी भेट घेऊन निवदेन दिले आहे. गुरनानी म्हणाले, कोथरूडमधील बऱ्याच भागात वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे आणि त्यात पावसामुळे तर अजूनच वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा वीज गेल्यास ती पुन्हा 3-4 तासांनी येत आहे, तर काही भागात याहून अधिक वेळ वीज जात आहे. तसेच विजेचा भार कमी- जास्त होत असल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे बंद पडत आहेत व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व हालसुद्धा होत आहे. या सर्व विषयास अनुसरून राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने आज कोथरूड महावितरण अभियंता राजेश काळे यांना निवेदन देण्यात आले व याकडे लक्ष देऊन वारंवार वीज खंडीत होणार नही याची दक्षता घेतली पाहिजे, अशी मागणी केल्याची माहिती गुरनानी यांनी दिली.