दोन दिवसांत तोडगा काढा, अन्यथा रस्ता अडवू! शशिकांत शिंदेंचा सरकारला थेट इशारा
Shashikant Shinde On Pune MPSC Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रविवारी रात्री भेट देत पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला दोन दिवसांचा अवधी देत, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र परीक्षा प्रक्रियेत पेपरफुटीचे प्रकार, भरती प्रक्रियेतील विलंब आणि त्यातून निर्माण होणारी अनिश्चितता यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून अन्यायाविरोधात उभ्या राहिलेल्या युवा शक्तीचे आंदोलन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा, सांगली, कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण राज्यातील गरिबांच्या घरातील विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटीच्या घटना समोर येत असतील आणि भरती प्रक्रिया रखडत असेल, तर विद्यार्थ्यांनी किती वर्षे वाट पाहायची, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी सरकारला केला. यापुढे पेपरफुटी अथवा विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात मोठ्या ताकदीने आवाज उठविला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या चार दिवसांपासून काही विद्यार्थी उपोषणाला बसले असून सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. मागण्या मान्य केल्याचे सांगितले जात असतानाही विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत, यामागे राज्य सरकारच्या विरोधातील वाढता असंतोष असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
राज्य सरकारने दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर पुढील आंदोलनाची दिशा अधिक तीव्र केली जाईल. विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात आपण सर्वप्रथम पुढे राहू, असे सांगत त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
एमपीएससीच्या परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे सरकारी सेवेत संधी मिळावी आणि त्यांना मानसन्मानाने रोजगार उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडे संबंधित जबाबदारी देण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात यावी, असे शिंदे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा किंवा त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ नये. पुण्यातील विद्यार्थ्यांची एकजूट आणि आंदोलनाची ताकद मोठी आहे. ही ताकद लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी वापरली पाहिजे, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.






