फोटो सौजन्य – सोशल मीडिया
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. द्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी दखील राजकारण सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महायुतीमधील नेत्यांच्या बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. जागा वाटपाबद्दल नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानानंतर महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपावरुन राजकारण सुरु असल्याचे बोलले जात आहे. यावर शिंदे गटाच नेते संजय शिरसाट यांनी देखील टीकास्त्र डागलं आहे.
काँग्रेसला त्यांचं नेतृत्व मान्य नाही
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या राजकारणावरुन टोला लगावला. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला पाहिजे’, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. यावर आमदार शिरसाट म्हणाले, “महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली असून त्यात संजय राऊतांनी काडी टाकाण्यास सुरुवात केली. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटतं काँग्रेस हे मान्य करणार नाही. याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा झाल्या. त्या सभांमध्ये खुर्च्यामधील बदल केलेलाही काँग्रेसला मान्य नव्हता. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर निवडणुका लढतील याची शक्यता नाही. एकवेळेला महाविकास आघाडी तुटेल पण अशा पद्धतीचा चेहरा समोर येणार नाही. हे सत्य आहे, असे स्पष्ट मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे व फडणवीस भेट
विधीमंडळामध्ये आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. याबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका लिप्टमधून प्रवास केला. याचा अर्थ समजून घ्या की आमचे वैयक्तिक भांडण नाही. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्यासारखे काहीजण मिसगाईड करतात. राजकीय भांडण हे वेगळं असतं. मात्र, प्रत्येकाचे वैयक्तिक संबंध असतात. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की मनभेद कधीही नसावे. मनभेद नसावे याचं उदाहरण आज आपण पाहिलं. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम नेत्यांनी केलं पाहिजे. त्यामुळे या भेटीला आम्ही वेगळं काहीही समजत नाही. त्यांची भेट झाली आम्हाला समाधान आहे”, असे मत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडले.