मंत्रिपद नाकारलं, आमदाराने थेट राजीनामाच दिला; शिंदेंच्या शिवसनेनेला मोठा धक्का
नागपूरमध्ये राजभवनात महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सुरू आहे. काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे तर मागच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. याचदरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस पाळलं नाही, त्यामुळे तीनदा आमदारकी भुषवणाऱ्या नरेंद्र भोंडेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात काही विद्यमान मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे ज्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात तीनदा आमदार म्हणून निवडून येणारे शिवसेनेचे नेते भंडारा- पवनी मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे.
नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी हा राजनामा दिला आहे. त्यामुळे भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीच्या 10 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर जोरदार तयारी सुरू आहे. 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता. त्यानंतर 33 वर्षांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात होत आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून मंत्रिपदाची इच्छाही त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली होती. अखेर देवेंंद्र फडणवीसांच्या तिसऱ्या कार्यकाळात भरत गोगावलेंची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंकरंद पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे जयकुमार रावल आणि गेल्या पाच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी अनकेदा बीडच्या नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. दरम्यान पंकजा मुंडे यांचे नाव घेताच समोर बसलेल्यात्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषही केला. 2014 ते 2019 या काळात पंकजा मुंडे बालकल्याण आणि महिला विकास या खात्याच्या मंत्री होत्या.
शिवसेनेचे संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचेधनंजय मुंडेयांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळख असलेले आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी गुजराती भाषेतून मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.