प्रियंका गांधींच्या प्रचारासाठी वायनाडमध्ये काँग्रेस व्यस्त आणि महाराष्ट्रात उद्धस्त, श्रीकांत शिंदे यांनी खरमरीत टीका (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव हा काँग्रेसचा अहंकार, गैरव्यवस्थापन आणि वैचारिक विरोधाभासामुळे झाला. त्यांचे पोकळ नेतृत्व, दूरदृष्टीचा अभाव आणि अपयशी कारभारामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकास आघाडीला नाकारले. सत्याला सामोरे जाण्याऐवजी काँग्रेस पक्ष वायनाडमध्ये प्रियंका गांधींची जागा जिंकण्यात व्यस्त होता, यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीत मविआ उद्धस्त झाली, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. गांधींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांच्यासाठी पक्षापेक्षा कुटुंब महत्वाचे आहे आणि राष्ट्रापुढे पक्ष आहे. लोकसभेत केलेल्या बेताल वक्तव्यांबाबत राहुल गांधी यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले बिनबुडाचे आणि हताश आरोप हे भारताच्या लोकशाही अखंडतेला क्षीण करण्याच्या प्रयत्नांपेक्षा अधिक काही नाही. काँग्रेस पक्षाच्या वारंवार झालेल्या निवडणूक अपयशावर मुखवटा घालण्यासाठी गांधी यांनी असे आरोप केले आहेत. महाराष्ट्राने 30 वर्षात सर्वाधिक मतदान केले, जे आपल्या लोकशाहीच्या ताकदीचा ऐतिहासिक पुरावा आहे. पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या निर्दोष व्यवस्थापनाचे संपूर्ण श्रेय भारतीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिले पाहिजे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काँग्रेस आणि उबाठाचे सत्तेचे आणि खुर्चीचे राजकारण मतदारांनी नाकारले आणि त्यांना घरी बसवले ही वस्तुस्थिती राहुल गांधीनी आता स्वीकारायला हवी, असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
राहुल गांधींचे तांडव जनमताचा कौल झुगारू शकत नाहीत. 2024 मधील भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर राहुल गांधींचे वारंवार हल्ले, पुराव्याशिवाय, हा केवळ लोकशाहीचा अपमान नाही तर आपल्या राष्ट्राची जागतिक प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षनेत्याचे हे वर्तन अशोभनीय आणि राजकीय हताशपणाचे असल्याची टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. त्यांनी मतदारांचा कौल नम्रतेने स्वीकारला पाहिजे आणि राजकीय फायद्यासाठी देशाच्या निवडणूक प्रक्रियेला बदनाम करण्याचे प्रयत्न बंद केले पाहिजेत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. लोकसभेत केलेल्या बेताल वक्तव्यांबाबत राहुल गांधी यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
महाराष्ट्राचा जनादेश स्पष्ट आहे. शेतकरी, तरुण, दलित, आदिवासी आणि महिलांनी मविआचे संधीसाधू राजकारण तसेच उबाठाकडून झालेली वैचारिक तडजोड झुगारुन स्थिर आणि मजबूत सरकारची निवड केली. मानहानिकारक पराभवातून गांधी अद्याप सावरलेले नाहीत, असेच दिसून येते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने मविआला पुन्हा एकदा का नाकारले याचे राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गांभीर्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्ला खासदार ड़ॉ. शिंदे यांनी यावेळी दिला.