राज्यातील गरीब आणि कामगारांसाठी सुरू केलेली शिवभोजन थाळी केंद्रे १ सप्टेंबरपासून बंद होणार ?
Shivbhojan Thali Yojna: राज्यातील तत्त्कालीन महाविकास आघाडी सरकराने राज्यातील गरीब लोक आणि कामगारांसाठी शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली होती. गरीबांना परवडेल अशी ५ रुपये आणि १० रुपयात ही शिवभोजन थाळी केंद्रे चालवली जात होती. पण आता हीच शिवभोजन थाळी केंद्रे आता संकटात सापडली आहेत. राज्य सरकार ही शिवभोजन थाळी केंद्रे बंद कऱण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२५ पासून शिवभोजन थाळी केंद्रांना अनुदान मिळालेले नाही, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शिवभोजन थाळी केंद्र चालकांनी ‘शिवभोजन थाळी केंद्र’ बंद करण्याचा इशारा दिला आहे. काहींनी १ सप्टेंबरपासून थाळी बंद करण्याची घोषणा केली आहे.
२०१९ मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाविकास आघाडीने राज्यात गरजू आणि गरीब कामगारांच्या पोषण आहारासाठी शिवभोजन थाळी केंद्र योजना सुरू केली होती. ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या योजनेमुळे काही लोकांना रोजगारही मिळाला, तर लाखो लोकांना पोषणयुक्त आहार मिळाल. पण आता अनुदानाअभावी ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवभोजन थाळीची मूळ किंमत ५० रुपये असूनही, या थाळीची किंमत १० रुपये ठेवण्यात आली. उर्वरित ४० रुपये सरकारकडून अनुदान म्हणून मिळतात. पण गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील अनुदान बंद झाल्यामुळे केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ६० केंद्रे कार्यरत आहेत आणि दररोज सुमारे ६ ते ७ हजार प्लेट अन्न वाटले जाते. महानगरांमध्ये ३० आणि ग्रामीण भागात ३० केंद्रांचा फायदा गरीब लोक घेत आहेत.
गेल्या काही वर्षांत गॅस, डाळी, तेल, भाज्या आणि विजेच्या किमती वाढल्यामुळे केंद्र चालवणे आणखी कठीण झाले आहे. चालक संकटात आहेत. किरकोळ विक्रेतेही आता उधारीवर साहित्य देण्यास नकार देत आहेत. कर्मचाऱ्यांना पगार देणे, भाडे देणे आणि इतर आवश्यक खर्च करणे कठीण झाले आहे. योजना सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. महागाईमुळे खर्च झपाट्याने वाढला आहे. परंतु सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मात्र तेवढीच आहे. ज्यामुळे तूट वाढली आहे. अशा परिस्थितीत ६ महिने अनुदान बंद केल्यानंतर सरकार काय करू शकते? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे. परंतु, त्याचवेळी गरजूंना आधार देणाऱ्या शिवभोजन थाळी योजनेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. राज्यातील लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, दिवसभरात परवडणाऱ्या दरात जेवण मिळत असल्याने गरिबांना दिलासा मिळतो. मात्र, ही योजना केवळ दिवसापुरतीच मर्यादित असल्याने रात्री उपाशी झोपावे लागते, अशी खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय, सरकारने केंद्र चालकांना दिले जाणारे अनुदान बंद केल्याने काही जिल्ह्यांमधील केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे, सरकार ही योजना हळूहळू बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्र चालकांकडून करण्यात येत आहे.
Radhashtami: राधा अष्टमीच्या दिवशी खावू नका या भाज्या आणि फळे अन्यथा संपत्तीसोबत बिघडेल तुमचे आरोग्य
चार महिन्यांचे अनुदान थकल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालक अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील जिल्ह्यातील २६ पैकी १४ शिवभोजन केंद्र बंद झाली असून उर्वरित १२ केंद्रे चालू आहेत. राज्य सरकारने ही शिवभोजन तातडीने अनुदान वितरीत न केल्यास ही शिवभोजन केंद्रे कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा आता शिवभोजन केंद्रांना फटका बसला असल्याचे चित्र आहे.