"...कॉलेज बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!", सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे -फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरु आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर गेल्या तीन वर्षात शिंदे -फडणवीस सरकारने शिक्षक भरती केलेली नाही. नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत. वसतीगृहाची व्यवस्था केलेली नाही, त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे -फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे.
याचविरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोग्य सुविधेतील त्रुटी दाखवून देत आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत यांनी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना धारेवर धरले.
यावेळी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! मेडिकल कॉलेज मध्ये शैक्षणिक सुविधा व शिक्षक न पुरवणाऱ्या सरकारचा निषेध असो! मेडिकल कॉलेज इमारतीचे काम रखडवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! अकार्यक्षम अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांचा निषेध असो, असे पोस्टर झळकवत सरकार विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्रुटींबाबतचे निवेदन अधिष्ठाता यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे आपल्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) १२ लाखाचा दंड केला आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सोयी सुविधा पुरविण्यात शिंदे -फडणवीस सरकार अपयशी ठरल्यामुळे आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि आपल्या नाकर्तेपणामुळे हा दंड भरावा लागला आहे. लाखोंचा दंड बसूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील त्रुटी अद्याप पर्यंत दूर करण्यात आलेल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीचा ८ डिसेंबर २०२० साली शासन निर्णय काढून एकूण ९६६ कोटी रुपये खर्चास मान्यता दिली होती.
त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे –फडणवीस सरकारला गेल्या तीन वर्षात या महाविद्यालयाची इमारत बांधता आली नाही. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत, वसती गृहाची व्यवस्था केलेली नाही. या महाविद्यालया नियमित पदे ५६४ मंजूर आहेत. त्यातील ३४ पदे भरलेली आहेत आणि एकूण ५३० पदे रिक्त आहेत. कंत्राटी पदे ५२२ मंजूर आहेत त्यातील सर्व पदे रिक्त आहेत. प्राध्यापकांची २२ पदे मंजूर आहेत त्यातील केवळ ५ पदे भरलेली असून १७ पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांची २६ पदे मंजूर असून केवळ ११ पदे भरलेली आहेत आणि १५ पदे रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापकांची ४३ पदे मंजूर असून केवळ ६ पदे भरलेली आहेत आणि ३७ पदे रिक्त आहेत. तांत्रिक ९१ पदे मंजूर असून केवळ ३ पदे भरलेली आहेत आणि ८८ पदे रिक्त आहेत. अतांत्रिक ९२ पदे मंजूर असून केवळ ७ पदे भरलेली आहेत आणि ८५ पदे रिक्त आहेत.
या सर्व सोयी सुविधांची पूर्तता करण्यात शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरले आहेत. मात्र आपण देखील सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात असमर्थ ठरले आहात हि खेदाची बाब आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्यासाठीच शिंदे- फडणवीस सरकार आपल्या माध्यामातून प्रयत्न करीत आहे. याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करतो. जर येत्या महिन्याभरात या महाविद्यालयात सर्व सोयी सुविधांची पूर्तता, तसेच महाविद्यालयाच्या नवीन इमारत व वसतिगृहाचे काम सुरु न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.