शंकरअण्णा धोंडगे यांचा पक्ष शिवसेनेत शिंदे गटात विलीन होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
डॉ. गंगाधर तोगरे : कंधार : गत चार दशकापासून शेतकरी कष्टकरी लोकांच्या न्याय मागण्यासाठी संघर्ष करणारे नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांची राजकीय दिशा ठरली आहे. त्यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र राज्य समिती (एम.आर.एस.) पक्ष शिवसेना शिंदे गटात विलिनीकरण करण्याचा निर्णय बाळांतवाडी येथील बैठकीत झाला. त्यामुळे राज्यासह लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ग्रामीण भागात शिरकाव करून संघटन करण्यास शेतकरी चेहऱ्याची मोठी मदत होणार असल्याचे मानले आहे. त्यामुळे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे शेतकऱ्यांचे पंचप्राण अन् ते उचलणार आता शिवसेना शिंदे पक्षाचा धनुष्यबाण असे समीकरण होणार आहे.
चार दशकांपासून शंकरअण्णांचा राजकीय प्रवास
माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी शेतकरी कष्टकरी, सामान्य माणसाचे प्रत्र प्रत्यक्ष अनुभवले अन भौगले. त्याचे चटके सहन करत प्रश्राला न्याय मिळवून देण्यासाठी चार दशकापेक्षा अधिक काळ संघर्ष केला. प्रसंगी अनेकदा कारावास भोगला. परंतु संघर्षाची धार कथी बोथट होऊ दिली नाही. शेतकरी नेते शरद जोशी सारख्या लढाऊ बाण्याचा सहवास लाभल्याने लढण्यास मोठी ऊर्जा मिळाली, परंतु शेतकरी कष्टकरी यांचे संपूर्ण प्रत्र सुटत नव्हते. त्यामुळे राजकीय प्रवाहात उतरून सत्ता निर्माण करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष, मुळ राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना विधानसभा आमदार झाले. त्यातून शेती सिंचनासाठी कामाचा सपाटा लावला. त्यातून मन्याडखोऱ्यात सिंचन क्षेत्र वाढण्यास मोठी मदत झाली. कालांतराने अब की बार किसान सरकारचा नारा देत भारत राष्ट्र समितीचे गुलाबी वादळ राज्यात निर्माण करण्यासाठी राज्यभर संघटन केले. परंतु के. सी. आर. याच्या पक्षाचा पराभव तेलंगणात झाल्याने महाराष्ट्रातील गुलाबी वादळ गुल झाले.
हे देखील वाचा : बर्फाच्या चादरमध्ये खुलले केदारनाथ धामचे सौंदर्य; गुडघाएवढ्या बर्फात भारतीय सैनिकांचा खडा पहारा
मेळावा घेऊन शिवसेनेत करणार जाहीर प्रवेश
त्यामुळे शंकरअण्णा धोंडगे यांनी महाराष्ट्र राज्य समिती स्थापन करून राज्यात संघटन उभे केले. परंतु हा प्रवास तसा खडतर होता. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पासून पक्ष दूर राहिला. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना यापैकी एका पक्षासोबत जाण्याचा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा दबाव वाढला. राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी सत्ताधारी की विरोधी पक्ष असा पर्याय निवडायचा होता. कंधार येथील ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी शिवसेना ( शिंदे) सोबत जाण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेऊन शंकर अण्णा यांनी आपली राजकीय वाटचाल प्रशस्त करण्याचा निर्धार केला आहे, राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत कंधार बैठकीतील निर्णयाची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर एक भव्य मेळावा घेऊन शिवसेना पक्ष प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार आहे.
हे देखील वाचा : “आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने..! खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
महाराष्ट्र राज्य समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते व सहकाऱ्याची बैठक दि. २९ जानेवारी रोजी बाळंतवाडी कॉलेज कॅम्पस येथे होणार होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे बैठक रद्द करण्यात आली होती. दि.८ फेब्रुवारी रोजी सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन राजकीय दिशा बैठकीत निश्चित करण्यात आली. आज झालेल्या बैठकीला महाराष्ट्र राज्य समितीचे उपाध्यक्ष दत्ता पवार, विभागीय प्रमुख लक्ष्मणराव वंगे, जिल्हा समन्वयक सुभाषराव मोरे, दिलीप धोंडगे, शिवराज धोंडगे, माधवराव केंद्रे, संभाजी कल्हाळे, बापूराव केंद्रे, जीवनराव वडजे, श्रीराम पाटील, सदाशिव पळशीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला मतदारसंघातील २५० गावातील गत ४० वर्षांतील सहकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. प्रस्तावना दत्ता पवार तर सुत्रसंचालन शाहीर गौतम पवार यांनी केले.






