वाल्मिक कराड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला (फोटो -सोशल मीडिया)
मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मागील दोन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर धनंजय मुंडे यांनीदेखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष तपास पथकाने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी वाल्मिक कराडची संपत्ती आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानियां यांच्याकडूनही सातत्याने वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत दावे केले जात होते. इतकेच नव्हे तर विदेशातही वाल्मिक कराडची संपत्ती असल्याची माहिती तपास पथकाच्या तपासातून समोर आली होती. यानंतर आता तपास पथकाने वाल्मिक कराडची संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तपासात जसजशी त्याची संपत्ती समोर येत जाईल, तसतशी त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मिळावी, अशा आशयाचा अर्ज तपास पथकाकडून न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
Dharashiv Band: धाराशिव बंदची हाक….; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान वाल्मिक कराडला यापूर्वीच सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस आली होती. वाल्मिक कराडने जमवलेल्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीच्या अधिकाऱ्यानांही धक्का बसला होता. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजकारणासह वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबतही काही दावे केले होते. वाल्मिकने 1500 कोटींची संपत्ती मिळवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. त्यानंतर या संपत्तीच्या चौकशीसाठी ईडीने दोन महिन्यांपूर्वी वाल्मिकला यांना नोटीस बजावली होती.
याशिवाय आतापर्यंत सीआयडीने या प्रकरणात जप्तीही सुरू केली आहे. सीआयडीकडून या प्रकरणात खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकऱणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली होती. यात वाल्मिक कराडची 100 हून अधिक बँक खाती सील करण्यात आली आहे. म्हणजेच आता या खात्यांमधून वाल्मिक कराडला पैशांचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. यासोबत त्यांची आणखी कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत. त्याचाही शोध सुरू आहे. तसेच या जप्तीसंदर्भात उच्च न्यायालयाकडे पत्र सादर करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी पंढरपूरचे शेतकरी दिलीप नागणे यांनीदेखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले होते. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. कराडने हार्वेस्टिंग मशीनला प्रत्येकी 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो असे सांगून शेतकऱ्यांकडून 8 लाख रुपये घेतले होते. यावरून शेतकऱ्यांनी पैसे एकत्र करून मुंबईतील विश्रामगृहात कराड यांना देणगी दिली. पण पैसे दिलेल्यांपैकी एकाही शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही. जेव्हा शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मागितले, तेव्हा त्यांनी कराडला पैसे परत मागितले. यावरून कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बीडला बोलावून शेतकऱ्यांना मारहाण केली, असे दिलीप नागणे यांनी सांगितले होते.