फोटो सौजन्य-X
पनवेल : रेल्वे स्थानकात दिवा-रोहा आणि वसई-पनवेल या दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्लॅटफॉर्म अचानकपणे बदलण्यात आल्याने दोन्ही गाड्या पकडण्यासाठी रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. त्यातून मोठी चेंगराचेंगरीही झाली. त्यात सरकत्या जिन्याची व्यवस्थाही बंद पडल्याने अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
हेदेखील वाचा : Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार कृष्णा आंधळे नक्की आहे तरी कोण? सुरेश धस यांनी दिली महत्त्वाची माहिती
पनवेल स्थानकात दोन्ही गाड्या एकाचवेळी येतात. पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लावल्या जातात. सोमवारी मात्र काही तांत्रिक कारणामुळे दोन्ही गाड्यांचे प्लॅटफॉर्मच ऐनवेळी बदलण्यात आले. त्याची घोषणा ध्वनीक्षेपकावरुन करण्यात आल्याने दोन्ही गाड्या पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. पनवेल स्थानकावर प्रवाशांसाठी एकच पदपथ आहे. शिवाय एका बाजूच्या जिन्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या ब्रिजवर मोठी गर्दी झाली.
ढकलाढकलीमध्ये अनेक प्रवासी खाली पडले. प्लॅटफॉर्म सहा आणि सातवर जाणारा एक जिना कामानिमित्त बंद असल्याने सर्व भार स्वयंचलित जिन्यावर पडत आहे. या एकाच जिन्याने दोन्ही प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना चढउतार करावी लागते. त्यातच वीज गेल्याने स्वयंचलित जिनाही बंद झाला. त्यामुळे ट्रेन पकडण्यासाठी दोन्ही बाजूचे प्रवासी जिन्याच्या दोन्ही बाजूस चढून पुलावर आले आणि गर्दी वाढली. त्यामध्ये अनेक प्रवाशांच्या दोन्ही गाड्या चुकल्या.
वसईला जाणाऱ्या एका महिलेला गाडी चुकल्याचे समजताच बीपीचा त्रास जाणवू लागला. याबाबतची तक्रार त्या महिला प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे केली. मात्र, त्याबाबत प्रशासन गंभीर दिसले नाही. यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. पनवेल स्थानकावर लोकल आणि एक्स्प्रेसच्या प्रवाशांना ये-जा करण्यासाठी एकच पूल आहे.
हेदेखील वाचा : GB Syndrome : जीबी सिंड्रोमचा राज्यात दुसरा बळी, ससूनमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू; रुग्णसंख्या १२७ वर