नागपूर : होळीपासून उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारीच्या मध्यातच सूर्य तळपू लागला असून, थंडीने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे पाराही चढला असून, ही उन्हाळ्याची चाहूल मानली जाते. दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागतात. रात्रीची थंडीही बेपत्ता झाली आहे.
दिवसभर आणि रात्रीही पंखा सुरूच ठेवावा लागतो. सध्याच्या वातावरणाचा अंदाज घेऊन यंदा होळीपूर्वीच कुलर लावावे लागतील, अशी शक्यता नागपूरकर वर्तवित आहेत. काहींनी आतापासूनच कुलर सुरू करण्याची तयारी चालविली आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान 34.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा 1.6 अंशाने अधिक आहे. किमान तापमानही 19 अंशांवर आले असून, ते सरासरीपेक्षा 3 अंशांनी अधिक आहे.
सरबत, रसवंती सुरू
उन्हाळ्याची चाहूल लागताच शहराच्या वेगवेगळ्या भागांत आतापासूनच कुलरच्या ताट्यांना लावल्या जाणाऱ्या वुडवूलच्या विक्रीची दुकाने लागणे सुरू झाले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथवरच ही दुकाने लागली आहेत. या सोबतच ठिकठिकाणी लिंबू सरबत, गारेगार मिल्क शेकची दुकानेही सजली आहेत. प्रत्येकच मार्गावर रसवंत्याही दिसत आहेत.
…तर यंदा उन्हाळा चांगलाच तळपणार
सूर्य तळपू लागताच कार्यक्रमांमधील गर्दी ओसरली. हजर असणारेही उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करताना दिसले. दुपारच्या वेळी काहीशी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वातावरणातील बदल लक्षात घेतल्यास यंदा उन्हाळा चांगलाच तळपणार असल्याचे सांगितले जात आहे.