File Photo : Marathwada
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विद्यापीठाची मंगळवारी सुरु झालेली परीक्षा पहिल्याचा दिवशी गोंधळाची ठरली. बीए, बीकॉम परीक्षेचे हॉलतिकीट परीक्षा सुरू होईपर्यंत न मिळाल्याने ओळखपत्र, बैठक क्रमांकावर तर काही ठिकाणी कायम नोंदणी क्रमांकावर (पीआरएन) परीक्षा देण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर आली.
परीक्षा काही तासांवर आली तरी हॉलतिकीट न आल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत अनेक विद्यार्थी, महाविद्यालयांचे प्रतिनिधींनी विद्यापीठात धाव घेतली होती. परंतु, मंगळवारी सकाळी परीक्षा सुरू झाली. तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले नव्हते. अनेक महाविद्यालयांमध्ये हॉलतिकीट घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगाही पाहायला मिळाल्या. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आले नसल्याचे सांगण्यात आले. समन्वयकांनी विद्यापीठ परीक्षा विभागाकडे चौकशी केली.
‘एनईपी’ धोरणाचा फज्जा
या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट विद्यापीठाकडून आले होते. परंतु बीए, बीकॉम अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आलेले नव्हते, असे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले. हॉलतिकीटाचा प्रश्न सुटत नसल्याने बैठक क्रमांक, महाविद्यालय ओळखपत्रावर प्रथम सत्र परीक्षा घेण्यात आली.
काही केंद्रांवर अधिकचे विद्यार्थी देण्यात आल्याचे तर एका केंद्रावर विद्यार्थी पोहचले. तर त्यांना संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षा नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची ऐनवेळी धावपळ झाली.
PRN वर परीक्षा घेणार नसल्याची भूमिका
‘पीआरएन’वर परीक्षा घेणार नाही, अशी घोषणा विद्यापीठाने केली होती. परंतु ‘एनईपी’ धोरणानुसार प्रथम सत्र परीक्षेत पहिल्याच दिवशी कारभार फोल ठरला.
महाविद्यालयाची परीक्षेकडे पाठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाने आपल्या केंद्रावर मिलिंद विज्ञान महाविद्यालय व डॉ. रफीक झकेरिया महिला महाविद्यालयातील परीक्षार्थीची परीक्षा घेतली नसल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. विद्यापीठातील अधिकारी सूत्रांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात बीसीएस संगणकशास्त्र अभ्यासक्रमाची परीक्षा मंगळवारी होणार होती. या केंद्रावर मिलिंद महाविद्यालय व डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालया अशा दोन महाविद्यालयातील १२३ परीक्षार्थी विद्याध्यांसाठी हे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात केले होते. त्यानुसार विद्यार्थी दुपारी दोन वाजता संबंधित परीक्षा केंद्रावर पोहचले. परंतु परीक्षा प्रमुखांनी या परीक्षा केंद्रावर इतर महाविद्यालयांच्या परिक्षार्थीची परीक्षा नसल्याचे सांगितले आणि त्यांना मज्जाव केला.