सोलापूर सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांकडून जंगी स्वागत करण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
सोलापूर : फुग्यांनी सजविलेल्या स्वागत कमानी…! लहान मुलांचे पाय कलरमध्ये बुडवून पायाचे ठसे घेण्यात दंग असलेल्या शिक्षिका…! शाळेत पहिले पाऊल ठेवण्यासाठी बालकांची अन् पालकांची धडपड….विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी चक्क आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व जिल्हा परिषदेचे सीईओ उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील वातावरण बदलून गेले.
जमिनीवर बसून जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केले विद्यार्थांचे स्वागत
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी देगाव येथील प्राथमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी स्वतः हून शाळेत स्वागता साठी हजर झाले. जिल्हाधिकारी उंचीने मोठे असल्यामुळे लहान बालकांच्या बरोबरीने फोटो घेणे साठी जिल्हाधिकारी यांनी जमिनीवर बसून विद्यार्थ्यांसमवेत फोटो घेतले. जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी नवागतांशी हितगुज साधत संवाद साधला. जिल्हाधिकारी यांचे प्रेमाने विद्यार्थी भारावून गेले. या प्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते.
सिईओ कुलदीप जंगम यांनी सेल्फी घेऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत ..!
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोमवारी शाळा प्रवेशोत्सवानिमित्त मोहोळ तालुक्यातील पापरी शाळेस भेट दिली. जंगम यांनी इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून मुलांमध्ये मिसळून सेल्फी काढला. नवागत विद्यार्थ्यांना पावलांचे ठसे पालकांना वाटप केल्यामुळे पालक खुश दिसून येत होते.
पापरी शाळेच्या प्रांगणात आज नवागत विद्यार्थ्यांचे स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी
गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, उपशिक्षणाधिकारी ढेपे , विस्तार अधिकारी स्वामी, या कार्यक्रमा प्रसंगी सरपंच जयश्री कोळी उप सरपंच अमोल भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सर्व पालक उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पापरी शाळेचा पॅटर्न ..!
पापरी शाळे लोकवर्गणीतून नवागतांना गणवेश, पुस्तके, बूट – सॉक्सश वाटपाचे नियोजन केले होते. पापरी शाळेने केलेली विविध लोकोपयोगी कामांचे सादरीकरण करणेत आले. या प्रसंगी सर्व शालेय पूर्वतयारी व प्रवेशोत्सव पाहून शाळेचे अभिनंदन केले. या प्रसंगी सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते वृक्षारोपण करणेत आले.
पापरी जिल्हा परिषदे शाळेच्या पटाची १ हजाराकडे वाटचाल …!
सोलापूर जिल्ह्यात खाजगी शाळांची संख्या वाढत असताना मोहोळ तालुक्यातील पापरी जिल्हा परिषदेच्या शाळेतील पट संख्या 824 झाली आहे. या शाळेतील पट संख्या एक हजार करणेचा मानस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी केला आहे. सध्या 1000 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. या बद्दल वर्गशिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे सिईओ जंगम यांनी अभिनंदन केले.
पोलिस आयुक्त राजकुमार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्हा परिषद शाळा मजरेवाडी येथे सोलापूर शहर पोलिस आयुक्त राज कुमार यांनी नवागत विद्यार्थ्यांचे गुलबापुष्प देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद शाळेत आयुक्त स्वागता साठी आल्याने पालक व शिक्षकांच्या आनंदाला पारवार उरला नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सरसावले आमदार .. !
आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून वृक्षारोपण केले. तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील — येथील प्राथमिक शाळेत जाऊन नवागतांचे स्वागत केले. बाळे येथील प्राथमिक शाळेत आमदार विजयकुमार देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. बार्शी तालुक्यातील उपळाई ढोंगे येथे बार्शी चे आमदार दिलीप सोपल यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सांगोलाचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सुविद्य पत्नी डॉ सौ निकिता देशमुख यांच्या हस्ते पेनूर शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.