मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे (फोटो- टीम नवराष्ट्र)
कलेचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख
अशांत मोर यांनी निर्माण केली स्वतःची ओळख
अशांत मोर यांनी साधला ‘नवराष्ट्र’शी संवाद
तेजस भागवत/ पुणे: कोल्हापूरला कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. कलेची विविधता आपल्याला तिथे अनुभवण्यास मिळते. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील ‘मायक्रो आर्टिस्ट’ अशांत मोरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्यांना आपली कला जागतिक स्तरावर देखील पोहोचवायची आहे. त्यानिमित्त अशांत मोरे यांनी ‘नवराष्ट्र’शी खास संवाद साधला. यामध्ये त्यांनी या कलेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
अजित पवारांची कलाकृती साकारत असताना तुमच्या भावना काय होत्या?
अशांत: कोल्हापूर कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मी मायक्रो आर्टिस्ट म्हणून काम करतो. मी तीळ, तांदळावर पेंटिंग केली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाची धक्कादायक बातमी सकाळी कळली. त्यामुळे संपूर्ण राज्याला धक्का बसला. आपल्या कलेतून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी देखील एक छोटासा प्रयत्न केला. साधारण मी तीन बाय तीन इंचाच्या साईजची पेंटिंग तयार केली.
तुम्हाला या क्षेत्रांमध्ये येण्याची आवड कशी निर्माण झाली?
अशांत: कोल्हापूरमध्ये अनेक मोठे आर्टिस्ट आहेत. प्रत्येकाची शैली वेगळी आहे. मी काहीतरी वेगळे करून माझे नावे उदयास आणण्यासाठी मी मायक्रो आर्टिस्ट झालो. म्हणजे जिल्ह्यात अजूनपर्यंत मायक्रो आर्टिस्ट कोणी नाहीय. आपल्या बोटाच्या नखांचा आकार असतो, त्या आकाराचे श्री स्वामी समर्थांचे पेटींग तयार केले होते. त्यानंतर मी यामध्ये सातत्याने काम करत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि शाहू महाराज यांचे देखील मी मायक्रो पेंटिंग तयार केलेले आहे.
या सबंधित तुम्ही कोणते शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतले का?
अशांत: मी लहानपणापासूनच कलेचे असे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. जन्मतः असलेली कला मी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचसोबत मी कोल्हापुरी फेटे बांधण्याची कला देखील जपतोय. मोठमोठ्या रांगोळ्या, संस्कार भारती अशा रांगोळ्या मी करतो, तसेच एक सर्पमित्र म्हणून मी सामाजिक कार्य देखील करत आहे.
कलाकृती तयार करताना कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते?
अशांत: कलाकृती तयार करत असताना संयम अत्यंत महत्वाचा आहे. अनेकावेळा श्वास रोखून सुद्धा कलाकृती तयार करावी लागते. यासाठी लागणारे ब्रश हे स्वतः तयार करावे लागतात. मी स्वतः असे ब्रश तयार केले आहेत. तांदूळ किंवा तीळ यावर तयार केल्या जाणाऱ्या कलाकृती मी भिंग, लेन्स या गोष्टींचा वापर न करता करतो. मी तुळशीच्या, तांदळाच्या खड्यावर विठ्ठलाची कलाकृती तयार केली आहे. शाहू महाराजांचे पेटींग खडूमध्ये कार्व्हिंग करून मी शरद पवारांना भेट दिले होते.
ही कला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आहात?
अशांत: मी जागतिक रेकॉर्ड करण्यासाठी उदबत्तीच्या काडीवर भारतीय संविधान लिहित आहे. त्यामुळे ही कला जागतिक जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे. मी टॅटूआर्टिस्ट असून माझ्या स्वतः चा स्टुडिओ आहे. एकदम सूक्ष्म कलाकृती तयार करताना अनेक अडथळे येतात. कलाकृती तयार करताना पूर्ण शांतता लागते. साधारण एक कलाकृती पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो.






