Tukaram Mundhe : ‘तुकाराम मुंढेंचं एक बाटली रक्त सर्व खातेप्रमुखांना द्या’; माजी मंत्र्याची हटके मागणी
राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अवैध गुटखा विक्रेते, भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत असताना आता माजी मंत्री सुबोध सावजी यांनी त्यांच्या कामाचे अनोख्या पद्धतीने कौतुक करत राज्याच्या मुख्य सचिवांकडे हटके मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नेते आणि माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र लिहून तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. तसेच राज्यातील इतर विभाग प्रमुखांनीही त्यांच्यासारखे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी एक आगळीवेगळी सूचना केली आहे.
आपल्या पत्रात सावजी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत भ्रष्टाचार आणि भेसळीविरोधात कठोर कारवाई करण्याचे काम तुकाराम मुंढे करत आहेत. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसत असून सामान्य जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे तुकाराम मुंढे यांचे एक बाटली रक्त काढून ते थोडे थोडे करून राज्यातील सर्व विभागांच्या खातेप्रमुखांना द्यावे, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. अर्थात ही मागणी प्रतीकात्मक स्वरूपाची असून मुंढे यांच्यासारखी कार्यक्षमता आणि कामाप्रती समर्पण इतर अधिकाऱ्यांमध्येही निर्माण व्हावे, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
सावजी यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, ज्या प्रकारे अशक्त रुग्णाला सशक्त व्यक्तीचे रक्त देऊन त्याला बळ दिले जाते, त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांच्यासारखी काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा राज्यातील इतर विभाग प्रमुखांना मिळाली पाहिजे.
“तुकाराम मुंढेंचं रक्त मिळाल्यास आपणांसह सर्व खातेप्रमुखांमध्ये काम करण्याची शक्ती निर्माण होईल आणि महाराष्ट्र अधिक सक्षम, सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होईल,” असा खोचक उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून एफडीएकडून राज्यभरात सुरू असलेल्या कारवायांची मोठी चर्चा आहे. अवैध गुटखा विक्री, अन्नपदार्थांतील भेसळ, औषध विक्रीतील अनियमितता आणि हॉटेल व्यवसायातील नियमभंग याविरोधात विभागाने मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून सामान्य नागरिकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थन व्यक्त केले होते.
दरम्यान, माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलेली ही अनोखी मागणी आणि मुख्य सचिवांना लिहिलेले पत्र आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याची राज्यभर चर्चा रंगली आहे.






