'मला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो'; मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार, नाईकांवर गंभीर आरोप
नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय संघर्ष आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारापर्यंत पोहोचला आहे. नवीन रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान झालेल्या कथित धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केली.
उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. स्थानिक पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. या प्रकारावर आक्षेप घेत मंदा म्हात्रे यांनी हा केवळ शिंदे यांचाच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधींचाही अपमान असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंदा म्हात्रे यांनी गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “मला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू आहे. कालच्या कार्यक्रमात मी उपस्थित होते. मात्र गणेश नाईक यांच्या समर्थक नगरसेवकांनी माझ्यासोबत धक्काबुक्की केली. कार्यक्रमस्थळी उभे राहायलाही जागा नव्हती. पहिल्या कार्यक्रमात मी फीत कापण्यासाठी उपस्थित राहिले, मात्र त्यानंतरच्या दुसऱ्या कार्यक्रमातून मी निघून गेले.” त्यांनी आरोप केला की, अशा प्रकारे दबाव निर्माण करून आपल्याला कार्यक्रमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Vidharbha Congress Politics: पूर्व विदर्भात राजकीय भूकंप! काँग्रेस आणि अजित पवार गटाला मोठे धक्के
मंदा म्हात्रे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत गणेश नाईक यांच्यावर थेट निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला, याचे कारणही हेच होते. मला शरद पवार किंवा अजित पवार यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नव्हती. मी १७ वर्षे राष्ट्रवादीसाठी काम केले. महाराष्ट्रातील पहिली महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्ष उभारण्यासाठी योगदान दिले. मात्र गणेश नाईक राष्ट्रवादीत आल्यानंतर माझ्यावर अन्याय सुरू झाला आणि अखेर मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.”
२०१४ मध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगताना म्हात्रे म्हणाल्या, “त्या काळात होत असलेल्या अन्यायामुळे मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. त्यांनी मला भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र दुर्दैवाने गणेश नाईकही नंतर भाजपमध्ये आले आणि पुन्हा तोच त्रास सुरू झाला.” कार्यक्रमांमध्ये जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी वरिष्ठ नेत्यांना याची माहिती असल्याचाही दावा केला.
गणेश नाईक यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मंदा म्हात्रे यांनी जोरदार हल्लाबोल केला. “ते म्हणतात की, मी कोणाकडे भीक मागत नाही, कष्टाने मिळवले पाहिजे. पण त्यांनी कुठे कुठे वजन वापरले म्हणून आज मंत्रीपद मिळाले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते भाजपमध्ये आले नसते तर आमदार आणि मंत्री झाले असते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
NDA चे राज्यसभेत वाढतंय संख्याबळ; 163 पर्यंत आकडा पोहोचण्याची शक्यता, आता घटनादुरुस्तीसाठी…
भाजपमधील आपल्या स्थानाबाबत बोलताना मंदा म्हात्रे म्हणाल्या, “भारतीय जनता पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच मला २०१४, २०१९ आणि त्यानंतरही पक्षाने उमेदवारी दिली. नवी मुंबईत भाजपचा झेंडा एकनिष्ठेने हाती घेणारी मी एकमेव व्यक्ती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश नेतृत्व आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याची पूर्ण जाणीव आहे.”
नवी मुंबईतील भाजपमधील हा संघर्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






