सुनेत्रा पवार सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज (Photo Credit- X)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार असल्याने बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवारी (दि ६ एप्रिल)दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
यापूर्वी सकाळपासूनच त्यांचा दौरा नियोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता त्या काटेवाडी येथील निवासस्थानी भेट देणार असून त्यानंतर ९.१५ वाजता कण्हेरी येथील हनुमान मंदिरात दर्शन घेणार आहेत. पुढे ९.३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.
यानंतर सकाळी १० वाजता बारामती शहरातील कसबा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. पुढे सव्वा दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी साडेदहा ते दुपारी सव्वा बारा या वेळेत कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांनंतर त्या प्रशासकीय भवन येथे जाऊन आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने प्रयत्न करावा असे आवाहन युवा नते जय पवार यांनी केले आहे.






