Photo Credit- Social Media Nagpur Riots News: नागपूर दंगल, भाजप कार्यकर्त्यांचा रोष अन् नागपूरमध्ये पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली
Nagpur Riots News: औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण असताना आणि संभाव्य अनुचित घटनेची पूर्वकल्पना असूनही, पोलिसांनी ही परिस्थिती योग्य पद्धतीने स्थिती हाताळली नाही, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू घेतली. मात्र, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आणि भाजप कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. विशेषतः तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सिंग यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा तीव्र रोष होता. या पार्श्वभूमीवर, संजय सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे ही बदली त्यांना त्या कारवाईची किंमत चुकवावी लागल्याची चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे.
17 मार्च 2025 रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे संपूर्ण शहरात पडसाद उमटले. सायंकाली सातच्या दरम्यान, एका जमावाने मोठा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. महाल परिसरासह आसपासच्या परिसरात तुफान दगडफेक, गाड्यांची जाळपोळ आणि पोलिसांवर हल्ले झाले, त्यामुळे परिस्थिती चिघळली. वाढता तणाव पाहता शहरात जमावबंंदीचे आदेश लागू करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी सुमारे 1200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल कऱण्यात आले. मुख्य आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ही महापालिकेने बुलडोजर कारवाईद्वारे त्याचे घर जमीनदोस्त केले.
पोलिस आणि राज्य शासनाच्या वतीने मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीनेही हा आरोप करत, “मुस्लिम समाजाच्या व्यक्तींवरच गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र आंदोलन भडकवणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,” असा आक्षेप नोंदवला आहे.
मलेशियातील हिंदू मंदिरांवर संकट; 2300 हून अधिक मंदिरे धोक्यात, पुरोहितांची मोठी सभा
या दंगलीला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या दंगलीत जखमी झालेल्या इरफान अन्सारी या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या तीन ते चार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले. त्यामुळे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके संतप्त झाले. त्यांनी रात्रीच तहसील पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला.हे प्रकरण शांत झाल्यानंतर लगेचच तहसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, त्यामुळे या बदल्या मागील कारणांबाबत चर्चेला उधाण आले आहे.