कोण होणार भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: गेले अनेक महीने भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की आठ-दहा महिने भाजपच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया रखडली आहे. मात्र सध्या अनेक नावांची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नागपूर दौऱ्यावर येऊन गेले. भाजपला लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. ते संपल्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे. तसेच एप्रिल महिन्यात नवीन नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप लवकरच अनेक राज्यांच्या अध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांचा समावेश असणार आहे,
भाजप पक्षाची स्वतः हाची घटना आहे. त्यानुसार अधिक राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणूक झाल्याशिवाय भाजपला राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया सुरू करता येत नाही. लोकसभा निवडणूक आणि अन्य कारण पाहता जेपी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल वाढवण्यात आला होता. मात्र आता भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. पुढील काही वर्षे भाजपसाठी महत्वाची असणार आहेत. 2029 मध्ये पुढील लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने ही निवड प्रक्रियेला महत्व प्राप्त झाले आहे.
मोदींचा ‘हा’ शत्रू भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार?
भाजपचे माजी संघटन मंत्री संजय जोशी यांचे नाव चर्चेत आले आहे. 18 वर्षांनी संजय जोशी यांना नवीन संधी मिळणार का हे पहावे लागणार आहे. 21 ते 23 मार्च 2025 या कालावधीत बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिवेशन पार पडले. त्यामुळे रामनवमी नंतर भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात चर्चा देखील झाल्याचे म्हटले जात आहे.
राजकारणातले तज्ञ मंडळींच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये केशुभाई पटेल ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री झाले . तेव्हाच नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांच्या मैत्रित मिठाचा खडा पडल्याचे म्हटले जाते. दोघांना पक्षाच्या आदेशानुसार गुजरात सोडावे लागले, मात्र काही वर्षांनी नरेंद्र मोदी हे शक्तिशाली नेता म्हणून गुजरातमध्ये परतले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र एका प्रकरणामुळे संजय जोशी यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली असे म्हटले जाते.
ज्या प्रकरणामुळे संजय जोशी यांचे राजकीय करियर धोक्यात आले. त्या प्रकरणात नरेंद्र मोदी समर्थकांचा हात असल्याचा संशय जोशी यांच्या समर्थकांना होता. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांच्यामधील दुरावा वाढत गेला असे म्हटले जाते. त्या प्रकरणात ते सहभागी नसल्याचे स्पष्ट होताच त्यांना पुनः पक्षात घेण्यात आले. त्यावळेस त्यांना विरोध झाला. मात्र संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमुळे त्यांचा विरोध बोथट झाल्याचे म्हटले जाते.