पुणे : कल्याण-नगर (Kalyan-Nagar) महामार्गावर पिंपरी (Pimpri) पेंढार जवळ गायमुख वाडी (ता. जुन्नर) येथे म्हशी घेऊन जाणारा टेम्पो (Tempo) क्र. एम. येच.०३ डीव्ही. ५७२० पलटी झाला. अपघातात आठ म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून दोन म्हशी गंभीर जखमी आहेत. तर चालकासह दोघेजण जखमी आहेत. ही घटना मंगळवार (दि १०) रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली.
मुंबई येथून कल्याण नगर महामार्गाने म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पिंपरी पेंढार परिसरातील साईनगर येथील वळणावर आला असता या ठिकाणी चालकाचा टेंम्पोवरील ताबा सुटल्याने तो रस्ताच्या लगत असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाला. या दुर्घटनेत टेम्पोत भरलेल्या १० म्हशींपैकी ८ म्हशी जागीच मृत्यू झाला तर चालक व आणखी एकजण जखमी झाल्याची माहिती ओतुर पोलीस सूत्रांनी दिली आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेऊन पोलीस हवालदार दत्ता तळपाडे, संदीप भोते, शाम जायभाय, अमोल पालवे घटनास्थळी हजर झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश खिल्लारी व डॉ. कैलास लुधरकर यांनी म्हशींची तपासणी करून ८ म्हशी मृत असल्याचे घोषित केले. तर दोन गंभीर झाल्या याबाबत सांगितले. अधिकचा तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहेत.