Thane News: मतदार यादीतील 'बनावट' मतदारांना शोधण्यासाठी मनसेचा मास्टर प्लॅन; बीएलएंना देणार कोडवर्ड
Thane News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता बूथ-स्तरीय एजंट (बीएलए) सक्षमीकरणावर आणि मतदार यादीतील कथित ‘बनावट’ मतदारांचा शोध घेण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेअंतर्गत, केवळ ठाणे शहरातच १५ ते २० हजार बीएलए नियुक्त करण्यात आले आहेत. हे एजंट मतदान केंद्रांवर सतर्क राहून संशयास्पद मतदारांवर लक्ष ठेवतील.
मनसे सूत्रांच्या माहितीनुसार, मतदानादरम्यान एखादा ‘बनावट’ मतदार आल्यास बीएलएंकडून “पुष्पा” किंवा “गोंद्या” (मराठी चित्रपटातील खलनायक) असा सांकेतिक संदेश(कोड वर्ड) पाठवला जाईल. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते त्वरित संबंधित मतदान केंद्रावर पोहोचून पडताळणी करतील. या नव्या रणनीतीमुळे निवडणुकीदरम्यान मनसेकडून मतदार याद्यांतील गैरव्यवहारांवर थेट पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गोरेगाव पूर्व येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या एका महत्त्वाच्या परिषदेत, मनसे नेते अविनाश जाधव आणि माजी आमदार राजू पाटील यांनी ठाणे आणि कल्याण ग्रामीणमधील मतदारांच्या डेटामधील विसंगतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कथित मतदार फसवणुकीवर टीका केली.
गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात; पोलिसांना घरात सापडला ॲम्युनिशन बॉक्स
मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी २०२० आणि २०२४ च्या निवडणुकीत टाकण्यात आलेली मते ईव्हीएम आणि मतदार यादीतील घोटाळ्यांद्वारे मिळवण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बनावट मतदारांना रोखण्याचे थेट आवाहन केले. ठाण्यात बनावट मतदारांना पकडणाऱ्या एजंटना सन्मानित केले जाईल अशी घोषणाही त्यांनी केली.
कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनीही त्यांच्या मतदारसंघातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत झालेल्या तफावतींकडे लक्ष वेधले आणि “पुष्पा आला रे” असे म्हणत बनावट मतदारांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केले. यासाठी अतिशय सक्षम आणि मजबूत बूथ-लेव्हल एजंटची आवश्यकता आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर “बनावट मतदार” समाविष्ट केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “मुंबईत ८ ते १० लाख, तर ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रत्येकी सुमारे ८ ते ८.५ लाख बनावट मतदार जोडले गेले आहेत,” असा दावा त्यांनी केला. तसेच, अशाच पद्धतीने राज्यातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्येही खोटे मतदार घुसवले गेले आहेत.