फोटो सौजन्य: iStock
अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील स्वामी नगर परिसरातील शास्त्रीनगर या दाट लोकवस्तीच्या भागात मागील काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना शहरातील स्टेशन परिसरापर्यंत पायी जावे लागत आहे, तर काहींना शेजाऱ्यांकडे किंवा ओळखीच्या लोकांकडे विनंती करून पाणी भरावे लागत आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून शास्त्रीनगरमध्ये पाण्याचा पुरवठा अत्यंत अनियमित झाला आहे. कधी दिवसानुदिवस नळ कोरडे राहतात, तर कधी दोन मिनिटांसाठी आलेले पाणी सर्वांना पुरेसे पडत नाही. या परिस्थितीमुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे हाल होत आहेत. महिलांना घरगुती कामे, स्वयंपाक आणि स्वच्छतेसाठी पाण्याची कमतरता भासत आहे.
या भागातील रहिवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, शहरात नगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. भावी तसेच माजी नगरसेवक प्रचाराच्या तयारीत गुंतलेले दिसत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही, असा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. “निवडणुकीच्या वेळी मतांसाठी आमच्या दारात येणारे नेते आज आमच्या पाणी समस्येकडे डोळेझाक करत आहेत,” असा संतप्त सूर रहिवाशांनी व्यक्त केला.
Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट; स्वेटर काढा अन् रेनकोट घाला, वादळी वारे, विजांसह…
स्थानिक प्रशासन आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा “लवकरच तोडगा काढू” असे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. शास्त्रीनगर परिसरातील अनेक नागरिक हे नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज परिश्रम करणाऱ्या या कामगारांना स्वतःच्या घरात पिण्याचे आणि अंघोळीचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे., त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढवा अशी अपेक्षा स्थानिक नागरिक नुरेमान शेख यांनी व्यक्त केली आहे.






