फोटो सौजन्य- प्रतिनिधी
यूथ फोरमतर्फे दरवर्षी डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रिडा संकूलात आगरी महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात प्रवेश शुल्क आकारले जाते. स्टॉल्स उभारले जातात. त्यातून नफा कमाविला जातो. मात्र या संस्थेला केवळ २ हजार रुपये शुल्क आकारुन हे क्रिडा संकुल कसे काय दिले जाते. आमचा आगरी समाजाला विरोध नाही. मात्र त्यांना मैदानाचे शूल्क आकारणात दिली जाणारी सूट ही महापालिकेच्या निकषात बसत नसल्याची बाब जागरुक नागरीक संतोष हाेळकर यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे. या प्रकरणी होेळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला आहे.
होळकर यांनी उपस्थित केलेले मुद्दे
प्रतिदिन २ हजार रुपये भाडे
आगरी महोत्सव ना नफा ना तोटा या तत्वार आयोजित केला जातो असे पत्र आगरी यूथ फोरमने मालमत्ता विभागाकडे मैदानाचे शुल्क भरताना दिले आहे. आगरी महोत्सव १० डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्या आधीपासून महोत्सवाचे स्टेज, मंडप आणि अन्य स्टॉल्स उभारण्याच्या कामाकरीता हे मैदान घ्यावे लागते. त्याकरीता हे मैदान ५ डिसेंबरपासून प्रतिदिन २ हजार रुपये भाडे आकारुन हे मैदान मालमत्ता विभागाने आगरी यूथ फोरमला दिले आहे. २५ अटीसह ही परवानगी दिली आहे.
अन्य संस्थाना हे मैदान देताना २५ हजार रुपये प्रति दिन भाडे
अन्य संस्थाना हे मैदान देताना २५ हजार रुपये प्रति दिन भाडे आकारले जाते. हे मैदान आगरी महोत्सवासाठी देताना महापालिकेच्या महासभेत २०११ साली पारित केलेला ठरावाशी विसंगत आहे. आगरी समाजाला विरोध नाही. पण सूट दिली जाते ही नियमाला धरुन नाही याकडे होळकर यांनी महापालिका प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
महोत्सव ना नफा ना तोटा या तत्वावर आयोजित केला जात नाही
होळकर यांनी सांगितले की, आगरी महोत्सवाकरीता प्रवेश शुल्क आकारले जाते. खाद्य पदार्थ आणि विविध गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स उभे केले जातात. त्यांच्याकडून भाडे वसूल केले जाते.. मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात. त्यासाठी विविध मोठ्या कंपन्यांचे प्रायोजक घेतले जातात. त्यामुळे हा महोत्सव ना नफा ना तोटा या तत्वावर आयोजित केला जात नाही असा मुद्दा होळकर यांनी उपस्थित केला आहे. या विषयी त्यांनी महापालिका आयुक्ताना हे पत्र दिले आहे. होळकर यांच्या पत्रापश्चात आयुक्त काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.