डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेची तुरुंगातून सुटका, मात्र 'या' अटींचे जाळे कायम, काय आहे कोर्टाचे आदेश?
न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे यांनी महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार आहे. तसेच ते ज्या राज्यात वास्तव्यास असतील, तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावणे बंधनकारक असेल. परिणामी आता रमेश म्हात्रे आरोप दाखल होईपर्यंत गोव्यामध्ये राहणार असल्याची माहिती समोर येते.
या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला असून, तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने घातलेल्या सर्व अटींचे पालन करणे आरोपींसाठी अनिवार्य राहणार आहे.
रमेश म्हात्रेंना मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द करत तातडीने शरण येण्याचे दिले निर्देश
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्यानंतर वैद्यकीय संघटनांनीही कठोर कारवाईची मागणी केली होती. शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या या घटनेत डॉ. वैभव साळुंखे, महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर तसेच रुग्णालयातील कर्मचारी यांच्याशी मारहाण, धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून संतापाची लाट उसळली.
सुरुवातीला विष्णुनगर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली होती. मात्र, विरोधक आणि डॉक्टर संघटनांनी रमेश म्हात्रे यांच्यावरही कारवाईची मागणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला.
या घटनेनंतर रमेश म्हात्रे यांच्या भूतकाळातील गंभीर गुन्ह्यांचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यांच्यावर यापूर्वी हत्येचा प्रयत्न, अपहरणासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचा उल्लेख विविध माध्यमांत करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टरांवरील हल्ल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधातील कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे. या प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे, ज्या वैद्यकीय क्षेत्राने रमेश म्हात्रे यांना भूतकाळात जीवदान दिले, त्याच क्षेत्रातील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
2008 मध्ये झालेल्या जीवघेण्या गोळीबारात रमेश म्हात्रे गंभीर जखमी झाले होते. गोळी शर्टच्या खिशातील पेनाला लागूनही त्यांच्या पोटात घुसली होती. त्यावेळी डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीची शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले होते. डॉक्टर मारहाण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील सुनावणी आणि आरोपपत्र दाखल होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक






