
डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, वादग्रस्त जागेवर सुमारे ५० घरे आणि एक बंगला आहे. संबंधित जागा विकासक रामेश्वर गुप्ता यांनी २०२३ मध्ये खरेदी केल्याचा दावा केला आहे. तसेच २०२५ मध्ये या जागेसंदर्भात करार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र या जागेच्या मालकी हक्काबाबत स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे.
Ganeshotsav 2026: डोंबिवलीत पर्यावरणपूरक पंचगव्य गणपतीची पर्वणी; घरच्या घरी करता येणार विसर्जन
संबंधित ५० घरांपैकी काही घरे रिकामी असल्याचे सांगण्यात येत असून, या घरांवर विकासकाच्या कर्मचाऱ्यांकडून जेसीबीच्या साहाय्याने तोडकाम सुरू करण्यात आले. याची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईला विरोध केला. यावेळी रहिवासी आणि विकासकाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
स्थानिक रहिवाशांनी संबंधित जागेवर आपला हक्क असल्याचा दावा केला आहे. जागा बळकावण्यासाठी कथित बनावट कागदपत्रांचा आधार घेतला जात असल्याचा गंभीर आरोपही काही रहिवाशांनी केला. या प्रकरणातील सर्व कागदपत्रांची अधिकृत यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
दुसरीकडे, विकासक रामेश्वर गुप्ता यांनी रहिवाशांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित जागा आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केली असल्याचा त्यांचा दावा आहे. काही रहिवाशांच्या विनंतीचा विचार करून त्यांना मोबदला देण्याचीही आपली तयारी असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
“माझी कागदपत्रे बनावट असल्याचा दावा केला जात असेल तर संबंधितांनी त्यांच्या मालकीची कागदपत्रे सादर करावीत. त्यांची कागदपत्रे खरी असल्याचे सिद्ध झाले तर मी संपूर्ण जागा सोडून देईन. माझ्याकडून कोणावरही अन्याय केला जाणार नाही,” असा दावा रामेश्वर गुप्ता यांनी केला.
या प्रकरणाला भाषिक किंवा अन्य प्रकारच्या वादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही गुप्ता यांनी फेटाळला. हा वाद केवळ जागेच्या मालकी हक्काशी संबंधित असल्याचे सांगत, आपल्याकडे कायदेशीर कागदपत्रे असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात पोलिसांनी योग्य चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, एकीकडे रहिवासी संबंधित जागेवर आपला हक्क सांगत आहेत, तर दुसरीकडे विकासकाने जागा कायदेशीररीत्या खरेदी केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमकी जागा कोणाच्या मालकीची आहे, संबंधित व्यवहार आणि करार कायदेशीर आहेत का आणि तोडकामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, या बाबींची अधिकृत तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. सक्षम प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतरच या मालकी हक्काच्या वादाचे नेमके चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.
Dombivli : डोंबिवलीत मोठा गणेश घाट रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात