"माझ्या कार्यकर्त्यांवर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला तर..."; महेश गायकवाडांचा विरोधकांना करारा जबाब
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर महेश गायकवाड यांनी कल्याणमध्ये सभा घेत पाठींबा दिलेल्या मतदारांचे जाहीर आभार मानले आहेत. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात भाजपाच्या सुलभा गणपत गायकवाड या बहुमतांनी निवडून आल्या आहेत. या निवडणूकीच्या रिंगणात सुलभा गायकवाड आणि महेश दशरथ गायकवाड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान या निवडणूकीत 81,114 मतांनी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वमध्ये घवघवीत यश मिळालं. मात्र काही मतांच्या फरकाने महेश गायकवाड पराभूत झाले. याच पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांनी कल्याणमधील जनतेशी संवाद साधत विरोधकांना इशारा दिला आहे.
“विधानसभा निवडणूकीत पराभव झाला असला तरी हार मानलेली नाही”, असं महेश गायकवाड यांनी सांगितलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांना विरोधकांनी कायमच धमकवण्याचा आणि त्यांच्यावर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यापुढे माझ्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर करारा जवाब मिळेल, असा इशारा महेश गायकवाड यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. सभेत कल्याण पूर्वेतील जनतेशी संवाद साधताना महेश गायकवाड म्हणाले की, बेसावध असताना भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी माझ्यावर गोळीबार केला. या विरोधकांना मी आव्हान देतो हिंमत असेल तर समोरासमोर वार करा, अशा कडव्या शब्दांत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर टीका केली आहे.
हेही वाचा- Sulbha Gaikwad: विजयानंतर सुलभा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ
“निवडणूकीत पराजय झाला असला, पद नसंल तरी जनतेची सेवा करण्यात मी कमी पडणार नाही”, असं आश्वासन महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील जनतेला दिलेलं आहे. जनतेशी संवाद साधताना महेश गायकवाड म्हणाले की, “येणारा काळ हा विकासाचा आहे. जनतेच्या साक्षीने आणि साथीने कल्याण आणि परिसरात जेव्हा जेव्हा बिकट समस्या येतील त्या ठिकाणी मी मदतीसाठी कायम तत्पर असेल” असा विश्वास महेश गायकवाड यांनी दिला आहे.
हेही वाचा- Kalyan: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप
कल्याण पूर्व विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने सुलभा गणपत गायकवाड यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. त्यानंतर महायुतीच्या या निर्णयाला विरोध करत महेश गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जमिनीच्या वादावरुन आमदार गणपत गायवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर बेसावध क्षणी गोळीबार केला होता. कायद्याला न जुमानता ज्या आमदाराने गोळीबार केला त्याच्याच कुटुंबातील व्यक्तीला निवडणूकीसाठी उमेदवारी देण्याला महेश गायकवाडांनी विरोध दर्शववला होता. त्यामुळे महायुतीच्या या निर्णयाला न जुमानता शिंदे गटातील महेश गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणूकीत 81,114 मतांनी सुलभा गायकवाड विजयी झाल्य़ा तर महेश गायकवाडांना 55,105 इतकी मतं मिळून देखील पराजय पत्करावा लागला.