फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर
कल्याणमधील बेतूरकर पाडा परिसरातील रहिवासी राम सोनी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालयात प्लास्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. बाहेरून प्लास्टर आणण्यास सांगण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड घेतोय आकार; सहा तालुके, 82 गावांना जोडणार
दरम्यान, रुग्णाच्या पायाला प्लास्टर करण्याऐवजी पुठ्ठ्याचा आधार देण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णालयाच्या उपचारपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्लास्टरची व्यवस्था बाहेरून करण्यास सांगण्यात आली होती. मात्र, तोपर्यंत पायाला पुठ्ठा लावण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाबाबत रुग्णालयाकडून ऑर्थोपेडिक डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे संबंधित तंत्रज्ञाकडूनही प्लास्टर करता आले नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांसाठी आवश्यक तज्ज्ञ सेवा उपलब्ध नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच मनसे नगरसेवक गणेश लांडगे रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. महापालिकेच्या रुग्णालयात सामान्य नागरिक उपचारासाठी येतात. मात्र, जर आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नसतील, तर सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी कुठे जावे?, असा सवाल गणेश लांडगे यांनी उपस्थित केला.
या घटनेमुळे रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता आणि फ्रॅक्चरच्या रुग्णांसाठी आवश्यक उपचारांची व्यवस्था याबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावल्याचा आरोप नेमका कोणत्या परिस्थितीत करण्यात आला, रुग्णावर पुढील उपचार काय करण्यात आले आणि रुग्णालयात ऑर्थोपेडिक डॉक्टर का उपलब्ध नव्हते, याबाबत महापालिका प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण अपेक्षित आहे. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई केली जाते का आणि रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Thane Water leakage : – ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.



