हजारो नागरीक पाण्यापासून वंचित असलेल्या नागरीकांनी शिवसेना नेत्यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला. कार्यालयाचे गेट जबरदस्तीने उघडून शिवसेना पदाधिकारी आणि महिलासह थेट अधिकाऱ्याच्या केबीनमध्ये घुसले. पाण्याची समस्या सोडवली नाही तर उग्र आंदोलन करु असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला. कल्याण पश्चिमेतील अनेक भागात भेडसावत असलेल्या पाणी समस्या बाबत आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी काय करीत आहेत? असा संतप्त सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.
कल्याण पश्चिमेतील आटाळी, खडवली, मोहने, आंबिवली, एनआरसी कॉलनी या भागात गेल्या एक वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. जो काही कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. तो पाणी पुरवठा कमी दाबाने केला जातो. माजी नगरसेवक धुर्योधन पाटील, माजी नगरसेविका हर्षदा थवील यांनी अधिकारी वर्गास वारंवार सांगितले की, या भागात पाणी येत नाही. अधिकारी काही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाहीत. अखेर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांनी केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता.
या वेळी महिलांनी त्यांच्या हाती कळशी आणि डोक्यावर रिकामा हंडा घेतला होता. अ प्रभाग कार्यालयात महिलांचा आक्रोश पाहून कार्यालयाचे गेट बंद केले गेले. शहर प्रमुख पाटील आणि माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी गेट जबरदस्तीने उघडून अधिकारी अशोक घोडे यांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी संतप्त नागरीकांनी त्यांची व्यथा मांडली. कशा प्रकारे पाणी पुरवठा केला जात नाही. वॉलमॅन जाणीवपूर्व पाणी सोडले जात नाही. वॉलमॅनच्या चापलूसीमुळे हाय प्रोफाईल सोसायट्यांना पाणी सोडतो. त्यासाठी त्याचे हात या सोसायट्यांकडून ओले केले जात आहे. यावेळी अधिकारी घोडे यांनी समजून सांगितले की, जी काही समस्या आहे. ती येत्या दोन तीन दिवसात सोडविणार. ज्या ठिकाणी यंत्रणा दुरुस्तीची गरज आहे. ती यंत्रणा दुरुस्त केली जाईल. वॉलमॅन संदर्भात ज्या तक्रारी आहेत. त्याची गंभीर दखल घेत चौकशी करण्यात येणार आहे. प्रश्न असा आहे की, गेल्या एक वर्षापासून नागरीक पाण्यापासून त्रस्त आहे. स्थानिक आमदार आणि खासदार याबाबत पुढाकार का घेत नाहीत? असाही प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.