एक तासाच्या पावसातच घरांमध्ये पाणी; केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर नगरसेवक कुणाल पाटील यांचा संतप्त ससंतप्
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात केवळ एक तासाच्या पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मुद्द्यावर सोमवारी झालेल्या महासभेत शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या घरात पाणी शिरलं तर आम्ही अधिकाऱ्यांना बसू देणार नाही असा इशारा देखील कुणाल पाटील यांनी दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात अधूनमधून पाऊस पडत असून, अल्प पावसातच अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील नवनाथ नगरसह विविध परिसरांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
महासभेत बोलताना शिवसेना शिंदे गट नगरसेवक कुणाल पाटील म्हणाले, “फक्त एक तासाच्या पावसात माझ्या प्रभागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नालेसफाईबाबत मी वारंवार महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वी शहर अभियंता अनिता परदेशी यांनीही माझ्या प्रभागाची पाहणी केली होती. त्यावेळी अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली दिसत नाही.”
तसेच, “कल्याण ग्रामीणमधील २७ गावांमध्ये विकासकामे होत नाहीत. या गावांसाठी महानगरपालिकेने निधी दिला आहे की नाही? जाणूनबुजून २७ गावांतील नागरिकांवर अन्याय का केला जात आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाकडे उपस्थित केला.महासभेदरम्यान या प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला. भविष्यातही पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, अल्प पावसातच अनेक भाग जलमय झाल्याने केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.






