मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांचा महाजाम! १५ ते २० किमीपर्यंत रांगा; प्रवाशांचे हाल
ठाण्यातील बहुचर्चित प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनामुळे मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. बुधवारी सकाळी वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली असली, तरी वाहनांची मोठी संख्या असल्याने कोंडी कमी होण्यास वेळ लागण्याची शक्यता होती.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना, कामगारांना आणि विद्यार्थ्यांना बसला. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अनेकांना नियोजित वेळेत इच्छित स्थळी पोहोचणे कठीण झाले. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठी कसरत करावी लागली. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.
महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिक रहिवासी भाविका भोईर यांनी वाहतूक कोंडीबाबत संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “आम्ही सकाळी पावणेसात वाजताच मुलांना घेऊन शाळेसाठी निघालो होतो. मात्र, तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना सातत्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागते.” मुलांच्या परीक्षा सुरू असताना अशा प्रकारची वाहतूक कोंडी झाल्यास त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणीही भाविका भोईर यांनी केली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील या कोंडीमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असताना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि वाहतूक वळविण्याचे नियोजन प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाया जात असून, कामावर जाणारे कर्मचारी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वेळापत्रकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी वेळेवर उपाययोजना करणे आणि प्रवाशांना पर्यायी मार्गांची माहिती देणे महत्त्वाचे ठरणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतुकीची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
Mumbai News: मेट्रो-रेल्वेनंतर आता रिक्षा, टॅक्सीही एका ॲपवर; एमएमआरडीएचा मोठा निर्णय
Ans: वर्सोवा पुलापासून विरार हद्दीपर्यंत मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
Ans: ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
Ans: कामगार, नोकरदार, वाहनचालक आणि परीक्षा सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. अनेक प्रवाशांना तासन् तास महामार्गावर अडकून पडावे लागले.






