
Thane News: वर्षानुवर्षे एकाच आरोग्य केंद्रात ड्युटी; वैद्यकीय अधिकारी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांच्या बदल्यांचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून त्याच आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी केली आहे.
या मागणीसाठी चव्हाण यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या नियमांनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ठरावीक कालावधीनंतर बदल्या होणे अपेक्षित आहे. मात्र नवी मुंबईतील २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये काही वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका दीर्घकाळापासून त्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे. एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत एकाच ठिकाणी काम केल्यामुळे स्थानिक पातळीवर काही व्यक्तींचे प्रभावक्षेत्र वाढण्याची शक्यता असते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोग्य सेवेत पारदर्शकता राहते का, प्रशासनाची कार्यपद्धती योग्य पद्धतीने सुरू आहे का आणि नागरिकांना अपेक्षित सेवा मिळते का, याबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या इतर विभागांमध्ये ठरावीक कालावधीनंतर बदल्या केल्या जात असतील, तर आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगळा नियम का, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा थेट संबंध सामान्य नागरिकांशी येतो. आजारपणाच्या काळात उपचारासाठी मोठ्या संख्येने नागरिक या केंद्रांवर अवलंबून असतात. त्यामुळे अशा ठिकाणी कामकाज खुले, नियमबद्ध आणि लोकाभिमुख असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. Thane News:
दहा ते पंधरा वर्षे एकाच केंद्रात काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांना इतर आरोग्य केंद्रांमध्ये पाठवावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. त्याचबरोबर भविष्यातही आरोग्य विभागातील बदल्या ठरलेल्या शासकीय धोरणानुसार वेळोवेळी करण्यात याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बदलीची प्रक्रिया नियमितपणे राबवल्यास कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव मिळेल आणि प्रशासनातील पारदर्शकताही वाढेल, असा दावा करण्यात आला आहे.
निवेदन देऊनही या विषयावर प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नितीन चव्हाण यांनी दिला आहे. आता महापालिका प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि दीर्घकाळ एकाच केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.