फोटो सौजन्य- pinterest
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. नागरिकांची पाण्याची गरज, मोर्बे धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा आणि सध्याचा पाण्याचा वापर यांचा विचार करून महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
‘एल निनो’ आणि ‘आय.ओ.डी.’च्या अंदाजासह जागतिक हवामान बदलाचा भारतीय मान्सूनवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन यंदा सरासरी पाऊस ९२ ते ९४ टक्के राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यामुळे पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने मे २०२६ पासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. तसेच जलतरण तलाव आणि सुरू असलेल्या बांधकामांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरावरही निबंध घालण्यात आले होते.
सुरू असलेल्या बांधकामस्थळांवरील पाणी जोडण्याही पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, या जोडण्यांमधून मिळणारे पाणी केवळ कामगार व कर्मचाऱ्यांच्या पिण्यासाठीच वापरण्याची अट घालण्यात आली आहे. पिण्याचे पाणी बांधकाम किंवा अन्य कारणांसाठी वापरले जात असल्याचे आढळल्यास संबंधित पाणी जोडणी तत्काळ खंडित करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जलतरण तलावातील पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करण्यासाठी पाणी पुनर्चक्रणाची व्यवस्था करणे आणि पाण्याची नासाडी टाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
१६ सप्टेंबर २०२५ रोजी मोर्थे घरणातील एकूण पाणीसाठा १०० टक्के, तर उपयुक्त पाणीसाठा ८४.४० टक्के होता, यंदा १६ सप्टेंबर २०२६ रोजी धरणातील एकूण पाणीसाठा ९१.०३ टक्के असून उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असला तरी सध्याची स्थिती समाधानकारक असल्याने आणि १० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही कपात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
मोर्बे धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठ्याचा ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कालावधीसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. उपलब्ध पाणीसाठा, प्रत्यक्ष पाणी वापर आणि पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंतची संभाव्य पाण्याची गरज यांचा विचार करून पाणीकपात कायम ठेवायची किंवा पुन्हा लागू करायची, याबाबत महानगरपालिका प्रशासन निर्णय घेणार आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करून पाण्याची बचत करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






