मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनचालक नेहमीप्रमाणे अॅक्टिवा स्कूटरने उड्डाणपुलावरून जात होता. त्यावेळी स्कूटरच्या आत काहीतरी हालचाल होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. सुरुवातीला त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, पुन्हा हालचाल जाणवल्यानंतर त्याने जवळून पाहिले असता स्कूटरच्या आतील भागातून एक साप बाहेर येत असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहताच वाहनचालक घाबरून गेला. मात्र, प्रसंगावधान राखत त्याने तत्काळ स्कूटर रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे उभी केली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाला नाही. उड्डाणपुलावर ही घटना घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. काही नागरिकांनी सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर तज्ज्ञांनी वाहनचालकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पावसाळ्यात उबदार आणि सुरक्षित जागेच्या शोधात साप, पाल आणि इतर सरपटणारे प्राणी अनेकदा वाहनांमध्ये आश्रय घेतात. त्यामुळे दुचाकी सुरू करण्यापूर्वी सीटखालील भाग, इंजिनजवळील जागा आणि इतर लपण्यासारख्या भागांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे.
विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाहन बराच वेळ उभे राहिल्यास त्यामध्ये साप किंवा इतर जीव आश्रयाला आलेले असू शकतात. त्यामुळे वाहन सुरू करण्यापूर्वी काही मिनिटे तपासणी करणे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तज्ज्ञांची मदत घेणे, हा अपघात टाळण्याचा सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे.
शांतता राखा: घाबरून अचानक ब्रेक लावल्यास किंवा वाहन रस्त्यावर सोडून दिल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे आधी स्वतःवर नियंत्रण ठेवा.
वाहन हळूहळू थांबवा: सुरक्षित जागी हळूच गाडी थांबवून गाडीच्या बाहेर पडा. सापाच्या हालचालींवर लक्ष ठेवा.
सापाला डिवचू नका: सापाला मारण्याचा किंवा स्वतःच्या हाताने पकडण्याचा प्रयत्न करू नका.
स्थानिक सर्पमित्राला संपर्क करा: ताबडतोब जवळच्या सर्पमित्राला किंवा प्राणी बचाव पथकाला (Animal Rescue Team) संपर्क करा.
वाहनाची स्वच्छता: तुमची ऍक्टिवा किंवा कोणतेही वाहन नेहमी स्वच्छ ठेवा.
पार्किंगची जागा: वाहन शक्यतो बंदिस्त किंवा स्वच्छ जागी पार्क करा. उघड्यावर, गवतात किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ वाहन उभे करणे टाळा.
नियमित तपासणी: पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात साप थंडावा शोधत वाहनांच्या इंजिनमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉडीमध्ये लपतात. त्यामुळे गाडी सुरू करण्यापूर्वी पुढील भागात किंवा डिक्कीत लक्ष टाकून खात्री करा.






