File Photo : Exam
नागपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील चतुर्थश्रेणीच्या 100 आणि क्लरिकल स्टाफच्या 170 जागांसाठी रविवारी राज्यभरातील केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. मात्र, नागपूर येथील जी. एच. रायसोनी वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा सुरू असतानाच संगणक बंद पडल्याने अनेक तरुणांचे पेपर अर्धवट राहिल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे संतापलेल्या उमेदवारांनी महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला असता, तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शांत बसविण्यात आले.
मंगळवारी बाजार येथील जी. एच. रायसोनी कॉमर्स कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर दुपारी साडेतीन नंतर हा प्रकार घडला. वास्तविक, या केंद्रावर दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 दरम्यान ही परीक्षा होणार होती. दोन तासांच्या या परीक्षेसाठी जवळजवळ 50 ते 70 उमेदवार परीक्षा देणार होते. त्यासाठी उमेदवारांना दुपारी 2 पर्यंत केंद्रावर पोचण्याची वेळ देण्यात आली. ठरल्याप्रमाणे विद्यार्थी 2 च्या सुमारास परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर दुपारी 2.30 वाजता परीक्षा केंद्रात संगणक सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही विद्यार्थ्यांचे संगणकच सुरू न झाल्याने त्यांना दुसऱ्या रुममध्ये बसविण्यात आले.
दरम्यान, तिथेही परीक्षा सुरू झाल्यानंतर उमेदवार ऑनलाईन पेपर सोडवत असताना अवघ्या काही मिनिटांत संगणक पुन्हा बंद पडले. पेपर अर्थवट राहिल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. केंद्रावरीलअधिकाऱ्यांनी त्यांना तांत्रिक बिघाडाचे कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीही रद्द झाली होती परीक्षा
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रिक्त जागांसाठी यापूर्वीही 21 डिसेंबरला असाच प्रकार घडला होता. विदर्भातील काही उमेदवारांना त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात केंद्र देण्यात आले होते. मात्र, त्यावेळीही सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांची ही ऑनलाईन परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे यापासून मुकलेल्या उमेदवारांची पुन्हा 29 डिसेंबरला नागपूरसह राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र देण्यासाठी आले होते. मात्र, रायसोनी कॉलेजमध्ये रविवारी परीक्षेदरम्यान संगणक बंद पडल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. याची चौकशी करून अर्धवट पेपर राहिलेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी, अशी मागणी उमेदवरांनी केली.






