महाबळेश्वर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचविलेल्या विकासकामांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, याबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. हे सरकार गतिमान आहे हे लोकांना आपल्या कामातून दिसले पाहिजे, अशा सूचना साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
हिरडा नाका येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व सातारचे अभिजित बापट, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी, अजय देशपांडे, शिवप्रसाद धुमाळ, गट विकास अधिकारी अरुण मरभळ, सुनील पार्टे, गट शिक्षणाधिकारी आनंद पळसे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रद्युमन बुलाख, आगर व्यवस्थापक नामदेव पतंगे आदी अधिकारी उपस्थित होते.
-महाबळेश्वर तालुक्याच्या विकासकामाबाबत चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र असल्याने त्यांनी महाबळेश्वर तालुक्यासाठी जवळजवळ अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून कोणती विकासकामे कारायची याची सूचना करून संबंधित विभागांकडून याबाबतचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार विविध विभागांनी सादर केलेल्या प्रस्तावांचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत घेतला.
-तहसील कार्यालयासाठी जागा ताब्यात घ्या
यावेळी तहसिद्लार सुषमा चौधरी पाटील यांनी तहसील कार्यालयासाठी नियोजित जागा दुग्धविकास विभागाची असल्याने त्या हस्तांतरणासाठी अडचणी येत असल्याने ना. देसाई यांना सांगितले. यावर ना. देसाई यांनी ही मिळकत जर शासकीय असेल तर परवानगीची कोणतीही गरज नसून तातडीने ही जागा ताब्यात घेऊन एक महिन्याच्या आत याचा विकास आराखडा सादर करावा. पाटण येथील कार्यालयाप्रमाणे एकाच ठिकाणी सर्वच विभागाची येथे कार्यालय करता येतील असे त्यांनी सुचविले.
– व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार
महाबळेशवरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या, आपण सादर केलेले २१५ कोटी रुपयांचे प्रस्ताव उपसचिव कार्यालयापर्यंत पोहचले असून लवकरच उपसचिवांकडून प्रस्तावास मंजुरी मिळेल. त्यावर ना. देसाई म्हणाले, दिवाळी हंगामामुळे गर्दी असून हंगाम संपताच बाजारपेठेतील कामे सुरु करता येतील. ही कामे २४x७ कामे सुरु ठेऊन दर्जेदार कशी होतील याकडे लक्ष द्या असे सांगितले. तसेच आपण स्वतः बाजारपेठेची पाहणी करून व्यापारी बांधवांच्या समस्या जाणून घेऊ असे देखील नमूद केले.
-गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी
महाबळेश्वर येथील या आढावा बैठकीत तीन ते चार विभागांचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते. या अधिकाऱ्यांसंदर्भात जिलाधिकाऱ्यांशी बोलताना ना. देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘हे असे चालणार नाही. सुट्टीचा दिवस असून इतर विभागांचे अधिकारी हजर आहेत मात्र तीन चार विभागांचे अधिकारी सुटीचे कारण देऊन गैरहजर राहतात, याचे कारण काय ?’, असा सवाल उपस्थित केला. पुढील बैठकीत अशी कोणतीही करणे चालणार नाही असा सज्जड इशाराही ना. देसाई यांनी दिला.