
पवई तलावाचे अस्तित्व आले धोक्यात! दररोज सोडले जाते १८ दशलक्ष लीटर मलजल; महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
मुंबईकरांसाठी महत्त्वाचा नैसर्गिक जलस्त्रोत आणि प्रमुख पर्यावरणीय ठेवा असलेला पवई तलाव सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे मरणासन्न अवस्थेत आहे. या तलावामध्ये दररोज तब्बल १८ दशलक्ष लीटर प्रक्रिया न केलेले मलजल थेट सोडले जात असून, यामुळे तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने राष्ट्रीय हरित केलेल्या एका लवादासमोर सादर प्रतिज्ञापत्राचा हवाला देत मुंबई महानगरपालिकेच्या या गंभीर कारभारावर बोट ठेवले आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठासमोर पवई तलावाच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाबाबत सध्या एक याचिका प्रलंबित आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान जलनायक डॉ. स्नेहल दोंदे यांनी ४ जून रोजी महत्त्वपूर्ण प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, पवई तलावासाठी पालिकेने प्रस्तावित केलेला मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, तोपर्यंत म्हणजेच पुढील दीड ते दोन वर्षे दररोज १८ दशलक्ष लीटर दूषित आणि मैलापाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट तलावात मिसळत राहणार आहे. तर बाजारात ‘इन-सिटू’ सारखे अत्यंत स्वस्त, जलद आणि प्रभावी पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही, पालिकेने अंतरिम उपाय म्हणून त्याचा वापर करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
पवई तलावाची दुरवस्था केवळ प्रदूषणापुरती मर्यादित नसून गाळाच्या समस्येनेही उग्र रूप धारण केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्याच मार्च २०२५ मधील अंतर्गत प्रकल्प अहवालानुसार, पवई तलावामध्ये सध्या सुमारे ४,५०० लाख घनमीटर गाळ साचला आहे.या अवाढव्य गाळामुळे तलावाची मूळ पाणी साठवण क्षमता तब्बल ३२.३० टक्क्यांनी घटली आहे. म्हणजेच, एकीकडे पाणी दूषित होत आहे तर दुसरीकडे तलावाची पाणी साठवून ठेवण्याची ताकदच संपत चालली आहे. यंदाच्या वर्षातपावसाचे प्रमाण कमी किंवा अनिश्चित राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशा बिकट परिस्थितीत मुंबईला पाण्याचा प्रत्येक थेंब जपून ठेवण्याची गरज आहे.मात्र पालिकेचे पवई तलावाकडे असे दुर्लक्ष करणे हे शाश्वत जलव्यवस्थापनाच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे, असे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले आहे. हा प्रकार केवळ पर्यावरणाचा ऱ्हास करणारा नसून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठीही मोठी धोक्याची घंटा आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा यांनी पालिकेला तात्काळ आणि युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.मुख्य मलनिःसारण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत वाट न पाहता, मैलापाणी अन्यत्र वळवण्यात यावे, तात्पुरत्या स्वरूपात जलद शुद्धीकरण तंत्रज्ञान वापरून तलावात जाणारे पाणी स्वच्छ करावे आणि साचलेला गाळ उपसण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.तसेच पवई तलाव ही मुंबईची सार्वजनिक मालमत्ता असून प्रशासनाने यात तात्काळ सुधारणा न केल्यास भविष्यात या तलावाचे पुनरुज्जीवन करणे अशक्य, होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.