तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार
बोईसर-तारापूर मार्गावरील स्टेट बँकेसमोर सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सलीम अफजल इंद्रजी (वय ७०) हे रस्त्याच्या कडेला चालत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (एमएच-०४-सी-१३५७) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पालघर जिल्ह्यात अवजड वाहनांच्या धडकेत अवघ्या तीन दिवसांत तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोईसर परिसरात यापूर्वी प्राप्ती प्रवीण जाधव आणि डॉ. विष्णूप्रभा या दोन तरुणींचाही अवजड वाहनांच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे अवजड व गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. नागरिकांनी प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेने विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, बोईसर रेल्वे स्थानक ते विजय नगर परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने राबविलेली फेरिवाले हटाव मोहीम अपयशी ठरल्याची टीका होत आहे. पदपथांवर लाखो रुपये खर्च करूनही पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पदपथ पादचाऱ्यांसाठी की फेरिवाल्यांसाठी?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






