फोटो सौजन्य - Social Media
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेत वाढ होऊन भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध दर्शन मिळावे, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी मंगळवारी मंदिर परिसराची सविस्तर पाहणी केली. यावेळी मंदिराच्या बाहेरील सर्व विनापरवाना व अतिक्रमणात्मक बांधकामे तातडीने हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात मार्गदर्शक नियमावलीची (एसओपी) काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मंदिर व्यवस्थापन, पोलिस प्रशासन, महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी समन्वयाने काम करून अतिक्रमण निर्मूलन, सुरक्षा आणि भाविक सुविधांबाबत तातडीची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले. मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवरील अधिकृत दुकानदारांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना क्रमांक देणे, तसेच दुकानांच्या जागांचे स्पष्ट चिन्हांकन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे भविष्यातील अतिक्रमणांना आळा बसेल आणि भाविकांची फसवणूक टळेल. यासोबतच मंदिर व्यवस्थापन समिती व दुकानदारांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्याचे आदेशही देण्यात आले. मंदिर व्यवस्थापनासाठी अस्तित्वातील एसओपीमध्ये सुधारणा करून नव्या गरजांनुसार बदल करण्यासाठी पोलिस प्रशासन, मंदिर प्रशासन आणि श्री पूजक यांच्या संयुक्त बैठकीतून सुधारित नियमावली तयार केली जाणार आहे. भाविकांची गर्दी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांचा दर तासाला आढावा घेण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दक्षिण प्रवेशद्वाराजवळील विद्यापीठ वाहनतळ बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी भवानी मंडप येथे स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळेल.
नवरात्र उत्सवाच्या काळात गर्दी व्यवस्थापन व गुन्हेगारी प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या पथदर्शी प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने, जिल्हा वार्षिक योजनेतून हा प्रकल्प कायमस्वरूपी स्वरूपात राबविण्यात येत आहे. या प्रणालींची अंमलबजावणी दोन महिन्यांत पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये ब्लॉकचेन व क्यूआर कोड प्रणालीचा समावेश असून, भविष्यात प्रत्येक भाविकाची नोंद डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहे. यामुळे सुरक्षा अधिक भक्कम होऊन गर्दी नियंत्रण व गुन्हेगारीला आळा बसेल.
शनिवार, रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी वाढणारी गर्दी लक्षात घेता जादा स्वयंसेवक नेमण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस व एनसीसीमधील प्रशिक्षणार्थी (इंटरनशिप) विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करून संबंधित विभागांनी अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.






