फोटो सौजन्य - Social Media
मराठी साहित्यविश्वासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ९९ वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज, गुरुवारपासून सातारा शहरात सुरू होत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यात होणारे हे साहित्य संमेलन चार दिवस चालणार असून, राज्यभरातून साहित्यप्रेमी, लेखक, कवी, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शाहू क्रीडा संकुलात या भव्य साहित्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व ‘पानिपत’कार विश्वास पाटील असून, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी २ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित राहणार आहेत, तर रविवारी होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे.
साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी आज विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ध्वजारोहण, ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन, कविकट्टा, गझलकट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथदिंडी, तसेच साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय बहुरूपी भारुड या लोककलेचा कार्यक्रमही रसिकांना अनुभवता येणार आहे.
उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर दिवसभर कवी संमेलन, परिचर्चा, परिसंवाद आणि नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. साहित्याच्या विविध प्रवाहांवर चर्चा, विचारमंथन आणि सादरीकरणातून मराठी साहित्याचे वैभव मांडले जाणार आहे.
शनिवारी कथाकथन, साहित्यिक मुलाखती, पुस्तक चर्चा अशा वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. विविध साहित्यप्रकारांतील लेखक आणि अभ्यासक आपले अनुभव व विचार मांडणार आहेत.
रविवारी दुपारी साडेचार वाजता संमेलनाचा समारोप होणार असून, यावेळी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ऐतिहासिक साताऱ्यात भरत असलेले हे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या आणि विचारपरंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सारस्वत मेळाव्यातून मराठी साहित्याचा समृद्ध वारसा आणि आधुनिक विचारप्रवाह यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार असून, साहित्यप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.






