आजची ‘जेन झी’ पिढी केवळ पुस्तकांतील सिद्धांतांपुरती मर्यादित राहू इच्छित नाही. तिला प्रत्यक्ष कौशल्यं, प्रॅक्टिकल अनुभव आणि वास्तवातील उपयोगी ज्ञान हवं आहे. हा बदल अचानक घडलेला नसून शिक्षण आणि करिअर क्षेत्रात झालेली मोठी उलथापालथ आहे. पालकांचा पारंपरिक ‘करिअरचा दबाव’ आता पूर्वीसारखा प्रभावी राहिलेला नाही. आजचे विद्यार्थी अशा अभ्यासक्रमांपासून दूर जात आहेत, जे आधुनिक, डिजिटल आणि स्मार्ट जगाशी जुळत नाहीत. कधी प्रतिष्ठेचं मानलं जाणारं सिव्हिल इंजिनिअरिंग आज फाइल्समध्ये धूळ खाताना दिसतंय, तर साधा बी.कॉम अनेकांना कंटाळवाणा वाटू लागला आहे.
नव्या वर्षात शिक्षण आणि करिअर क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थी आता पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी ‘फ्युचर रेडी’ आणि ‘जॉब रेडी’ कोर्सेसकडे अधिक वळत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखा ‘सदाबहार’ मानल्या जात होत्या. मात्र २०२६ च्या ट्रेंडनुसार या शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या क्षेत्रांमधील वाढत्या संधी. पारंपरिक इंजिनिअरिंगमध्ये नोकरीच्या संधी मर्यादित आणि पगारवाढीचा वेग कमी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
त्याचप्रमाणे कोणतीही ठोस विशेषज्ञता नसलेले सामान्य बीए किंवा बीकॉम अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे. आजच्या काळात ‘जनरलिस्ट’पेक्षा ‘स्पेशालिस्ट’ची मागणी जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थी साध्या बीकॉमऐवजी बीकॉम (ऑनर्स), फायनान्शियल अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, डेटा मॅनेजमेंट यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम निवडत आहेत. जुना आणि पूर्णतः थिअरीवर आधारित अभ्यासक्रम आजच्या कॉर्पोरेट जगातील आव्हानांसमोर अपुरा पडत आहे.
बीएड आणि इतर शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांबाबतही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झाल्याचं चित्र आहे. भरती प्रक्रियेत होणारा विलंब, मर्यादित संधी आणि खासगी शाळांमधील कमी पगार ही यामागची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी अध्यापनाऐवजी कॉर्पोरेट ट्रेनिंग, एड-टेक कंपन्या, कंटेंट क्रिएशन आणि ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याचा विचार करत आहेत.
अनेक अभ्यासक्रमांचा कालबाह्य अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पारंपरिक नोकऱ्यांवर आलेलं संकट, डिग्रीपेक्षा कौशल्यांना दिलं जाणारं प्राधान्य आणि फ्रीलान्सिंग-रिमोट वर्कचा वाढता कल या सर्व कारणांमुळे हा बदल वेग घेत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तेच अभ्यासक्रम टिकून राहतील, जे विद्यार्थ्यांना भविष्यातील गरजांनुसार कौशल्यांनी सक्षम करतील.






