कर्जत / जामखेड : कर्जत जामखेड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यविषयक सेवांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कर्जत-जामखेड तालुक्याच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज दिली.
कर्जत जामखेड येथे प्रत्येकी शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात राजेश टोपे बोलत होते. या कार्यक्रमप्रसंगी कर्जत शहराच्या नगराध्यक्षा उषा राऊत, आमदार रोहित पवार, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, कार्यकारी अभियंता संजय पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. खरपाडे, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंखे, कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कर्जत जामखेड तालुक्याला प्रत्येकी १०० खाटांचे आणि मिरजगांव येथे ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालये बांधण्यात येत असून, या तीनही रुग्णालयांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. आता नव्याने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयात नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांना आता उपचारासाठी अहमदनगरला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कर्जत जामखेड या उपजिल्हा रुग्णालयात सर्व उपचार उपलब्ध करून देण्यात येतील. पुढच्या काळातही या भागात विकासकामे हाती घेतली जातील, असे त्यांनी सांगितले.
या भागातील लोकांना आरोग्यासाठी एक मोठा आधार मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही रुग्णालये बांधण्यात येत आहे. सर्वांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य होत नाही, त्यासाठी हे रुग्णालये अत्याधुनिक स्वरुपातील रुग्णालये असणार आहे. रुग्णालयासाठी लागणाऱ्या सर्वसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.
आमदार रोहित पवार म्हणाले, शासनाच्या मदतीने १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय कर्जत व जामखेड येथे उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचा लाभ या भागातील व ग्रामीण भागातील जनतेला होईल. सुरूवातीला आरोग्यमंत्री यांनी कर्जत रुग्णालयाची पाहणी करुन येथे आयोजित केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते नव्याने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन व कोनशिले अनावरण झाले.
यावेळी कोविड काळात उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाऱ्या वितरकांचा सत्कार आणि पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर दुपारी जामखेड येथील मंजूर झालेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न झाले.